फोटो - सोशल मीडिया
सावंतवाडी : सिंधुदुर्गमधील राजकोटवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता. अगदी मागील वर्षीच डिसेंबर महिन्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुतळ्याचे अनावरण केले. मात्र अवघ्या 8 महिन्यांमध्ये हा पुतळा कोसळला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसलळ्यामुळे राज्यभरातून नाराजी व्यक्त करण्यात आली. समुद्रातील वाऱ्यांमुळे पुतळा कोसळला असून या पुतळ्याचे काम नौदलाच्या माध्यमातून करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र सरकारकडून जाहीर करण्यात आली. या प्रकरणावर आता शिंदे गटाचे आमदार व मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 28 फूट पुतळा पडला असला तरी 100 फूटाचा पुतळा नव्याने बनवण्यात येईल, असे वक्तव्य शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले आहे.
100 फुटांचा पुतळा उभा केल्यास
सावंतवाडीमध्ये मंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सिंधुदुर्गमध्ये झालेल्या या घटनेवर प्रतिक्रिया दिली. केसरकर म्हणाले, “मी अद्याप मालवणला भेट दिलेली नाही. मालवण येथील पुतळा नौदलाने स्थापन केला होता. सदर पुतळा कोसळला हे दुर्दैवी आहेच, पण यातून काही चांगल्या बाबी घडू शकतात. या पुतळ्याची उंची 28 फूट होती. मात्र येथील लोकांनी 100 फुटांचा पुतळा असावा, अशी इच्छा व्यक्त केली होती. जर 100 फुटांचा पुतळा याठिकाणी उभा केल्यास ती सर्वांसाठीच अभिमानाची बाब असेल. मी राजकोट किल्ल्याचा दौरा करून पाहणी करणार आहे.” अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे.
हे देखील वाचा – सिंधुदुर्गातील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्यामागे नेमकं कारण काय? नौदलाने दिले स्पष्टीकरण
व्यक्तिशः मला हा पुतळा लहान वाटला
पुढे त्यांनी मोठा पुतळा उभारण्याची मागणी केली. ते म्हणाले, “मालवणचा दौरा केल्यानंतर मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहे. आमच्याकडे मोठ्या पुतळ्याचे एस्टिमेट तयार आहे. मुंबईत आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारत आहोत. त्यामुळे तेवढा मोठा नाही, मात्र राजकोट किल्ल्यावर बसू शकेल एवढा मोठा पुतळा नक्कीच याठिकाणी उभारू. मी सिंधुदुर्गचा रहिवासी आहे. नौदलाने पुतळा उभारल्यामुळे आम्ही काही म्हणालो नव्हतो. पण व्यक्तिशः मला हा पुतळा लहान वाटला होता. त्यामुळे आता मोठा पुतळा उभारला गेला पाहिजे”, अशी मागणी दीपक केसरकर यांनी केली