संग्रहित फोेटो
अजय पाटील यांनी पत्नीची उमेदवारी शेवटच्या क्षणी नाकारल्यानंतर संतप्त होत शरद पवार गटाला रामराम ठोकला. “गेली ३० वर्षे निष्ठेने सोबत राहिलो, तरी पैसा खर्च करणाऱ्यालाच प्राधान्य,” असा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला. भावनिक स्वरात बोलताना त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले. त्यांनी तत्काळ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटात) प्रवेश करून पत्नी ज्योती पाटील यांचा नगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखल केल्याची घोषणा केली.
याच दरम्यान, अमोल शिंदे यांच्या पत्नीच्या उमेदवारीलाही नकार मिळाल्याने त्यांनी स्वतंत्र मार्ग पत्करला. गटाच्या निर्णयाविरोधात शिंदे यांनी पत्नीचा अर्ज अपक्ष म्हणून सादर केला. या दोन माजी नगराध्यक्षांच्या बंडामुळे रोहित पाटील गटातील अंतर्गत असंतोष उघड झाला आहे.
तासगावमध्ये आता राष्ट्रवादी (शरद पवार), राष्ट्रवादी (अजित पवार), भाजप व माजी खासदार संजय पाटील यांची विकास आघाडी असा चौरंगी मुकाबला निर्माण झाला असून, निवडणूक तापली आहे. एबी फॉर्मवरील निर्णयामुळे निष्ठावंत कार्यकर्ते अस्वस्थ झाले असून, शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या घडामोडींमुळे तासगावच्या निवडणुकीचे समीकरण बदलणार का याकडे तासगावकरांचे लक्ष लागले आहे.






