मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडत आहेत. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांना दणका देत शिवसेना आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह बहाल केले. या सर्व घडामोडीनंतर आज आम आदमी पक्षाचे संयोजक (Aam Aadmi Party) आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची ‘मातोश्री’ या निवासस्थानी भेट घेतली.
केजरीवाल आणि मान या दोन्ही नेत्यांनी उद्धव ठाकरेंशी विविध मुद्यांवर चर्चा केली. यावेळी केजरीवाल म्हणाले, ‘कोरोना काळात उद्धव ठाकरेंचे काम कौतुकास्पद आहे. आम्ही उद्धव ठाकरेंसोबत विविध मुद्यांवर चर्चा केली. कोरोना काळात आम्ही महाराष्ट्राकडून अनेक गोष्टी शिकलो. मुंबई आणि धारावीत त्यांनी कोरोना काळात ज्या काही गोष्टी केल्या. त्याची माहिती घेतली. त्यातून अनेक गोष्टी शिकल्या. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना वैयक्तिक भेटण्याची इच्छा होती. आज ती पूर्ण झाली, असे म्हणत त्यांनी इतरही मुद्द्यांवर हात घातला.
केजरीवाल म्हणाले की, आज तरुण बेरोजगारीमुळे त्रस्त आहेत. अनेक अडचणी येत आहेत. महागाई वाढत आहे. बऱ्याच वस्तू महाग होत आहे. देशाला गहाण ठेवण्याचे काम आता केले जात आहे. एकमेकांशी लढायचे नाही तर चर्चा करायची आहे. आम्ही देशातील सध्याच्या स्थितीवर उद्धव ठाकरेंशी चर्चा केली.
आम्ही देशाचा विचार करतो
आम्ही देशाचा विचार करतो. पण एक पक्ष आहे तो 24 तास निवडणुकीचा विचार करतो. दरम्यान, उद्धव ठाकरेंचे पक्ष नाव सगळं चोरीला गेलं. त्यांचे वडील वाघ होते आणि ते वाघाचे पुत्र आहेत. चिन्ह आणि नाव गेलं तरी ते वाघच आहेत. सर्वोच्च न्यायालयात त्यांना न्याय मिळेल, असेही त्यांनी म्हटले आहे.