फोटो - टीम नवराष्ट्र
मुंबई : बदलापूरमध्ये चिमुकल्यांवर अमानुषपणे अत्याचार करण्यात आले. अवघ्या 4 वर्षांच्या दोन मुलींवर शिपाई अक्षय शिंदे याने अत्याचार केले. यामध्ये मुलींच्या आतड्यांपर्यंत जखमा झाल्या आहेत. यामुळे संपूर्ण बदलापूर शहरामध्ये राज्यभरामध्ये तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. तसेच या प्रकरणाची पोलीस तक्रार आल्यानंतर देखील 12 तासांनंतर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांनी पोलीस आणि कायदा व व्यवस्था यावरुन सरकारला धारेवर धरले आहे. विरोधकांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आमदार भास्कर जाधव यांनी देवेंद्र फडणवीस यांचा गृह खात्यावर वचक नसल्याचे म्हणत टोला लगावला आहे.
गृहमंत्री असा पाहिजे की नुसती नजर फिरली तरी
शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. बदलापूरमध्ये झालेली घटना अतिशय निंदनीय असून यासाठी सरकारच जबाबदार असल्याचे मत आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केले. माध्यमांशी संवाद साधताना आमदार जाधव म्हणाले, “या घटनेला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे. पुण्याच्या अग्रवाल प्रकरणात रक्ताचे नमुने बदलण्यापासून घटना घडल्या आहेत. तसेचट नागपूरमध्ये पोलीलच स्टेशनमध्ये जुगार खेळत आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील परिस्थिती बघितली तर, खून, बलात्कार, दोन नंबरचे धंदे सगळ्यात जास्त नागपूरमध्ये आहेत. गृहमंत्री असा पाहिजे त्याची नुसती नजर फिरली, तरी पोलिसांच्या माना खाली झुकल्या पाहिजे. पोलिसांवर कंट्रोल नाही ठेवला तर, हे क्रूर होतील, हिंस्र होतील, रानटी होतील, पोलिसांना गृहखात्याचा दरारा पाहिजे, गृहमंत्री यांचा गृह खात्यावर वचक नाही, अशी घणाघाती टीका भास्कर जाधव यांनी केली आहे.
फडणीस यांचा अजिबात गृह खात्यावर वचक नाही
पुढे भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्या सरकारवेळेची परिस्थिती सांगून महायुतीला डिवचले आहे. भास्कर जाधव म्हणाले, “उद्धव ठाकरेंच्या कारकिर्दीत काही झालं की, चारही बाजूंनी बोलायचे. देवेंद्र फडणीस यांचा अजिबात गृह खात्यावर वचक नाही, मध्यंतरी लोकसभेचे कारण सांगून ते राजीनामा देत होते त्यांना माहीत होतं आपल्या कारकीर्दीचा भांडा फुटणार आहे. पोलिसांवर वचक नाही म्हणून पोलिसांची हिंमत वाढत आहे. त्यांना वाटतं, आम्ही काही चुका केल्या तरी मंत्री आमची बाजू सावरून घेतील”. अशी घणाघाती टीका भास्कर जाधव यांनी केली आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणावर महाविकास आघाडीने महायुतीला घेरले आहे.