कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री (फोटो- सोशल मिडिया/टीम नवराष्ट्र)
Murlidhar Mohol: महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडली आहे. राज्यात महायुतीला मोठे बहुमत प्राप्त झाले आहे. दरम्यान मुख्यमंत्री भाजपचाच होणार हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. काल दिल्लीत अमित शहा, अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात एक महत्वाची बैठक पार पाडली. दरम्यान या बैठकीत मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समोर येत आहे. दरम्यान अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी देखील भाजप जो चेहरा जाहीर करेल त्याला समर्थन देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र भाजप नेहमीप्रमाणे धक्कातंत्र वापरुन नवीन चेहरा देणार की फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार हे पहावे लागेल.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर कोण विराजमान होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मुख्यमंत्री भाजपचा होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र कोणाला संधी मिळणार हे पहावे लागेल. कारण धक्कातंत्रचा वापर करणे ही भाजपची खासियत आहे. याची जाणीव राजस्थान आणि मध्य प्रदेश पाहायला मिळाली आहे. त्यामुळे राज्यात भाजपकडून सध्या अनेक नावे मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत असल्याचे म्हटले जात आहे. भाजप नेतृत्वाचा इतिहास पाहता महाराष्ट्र राज्यात देखील नवीन चेहरा जाहीर केला जाणार की, फडणवीस यांनाच संधी मिळणार हे पहावे लागेल. भाजपमध्ये कोणते नेते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत, त्याबद्दल जाणून घेऊयात.
देवेंद्र फडणवीस
भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. सलग पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते दुसरे मुख्यमंत्री आहेत. तसेच सध्या ते राज्यातील भाजप पक्षाचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्या नेतृत्वात भाजपने सलग तिसऱ्यांदा १०० पेक्षा जास्त आमदार निवडून आणले आहेत. तसेच संघाचा देखील त्यांच्या नावाला पाठिंबा असल्याचे म्हटले जात आहे. फडणवीस यांना मुख्यमंत्री केले जाण्याची दाट शक्यता आहे.
विनोद तावडे
विनोद तावडे हे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. २०१४ मध्ये त्यांचे नाव देखील मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत होते. मात्र त्यावेळेस देखील भाजपने धक्कातंत्र वापरले होते. २०१९ पासून पक्षाने तावडे यांच्यावर अनेक राष्ट्रीय स्तरावरील जबाबदऱ्या सोपवल्या. मराठा आरक्षणाचे नेतृत्व करत असलेले मनोज जरांगे पाटील हे सातत्याने फडणवीस यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले. त्यामुळे राज्यात भाजपला मराठा चेहरा द्यायचा असल्यास विनोद तावडे यांच्या नावाचा देखील विचार केला जाण्याची शक्यता आहे.
पंकजा मुंडे
२०१४ मध्ये पंकजा मुंडे यांचे नाव देखील चर्चेत होते. मात्र फडणवीस यांना पक्षाने मुख्यमंत्री केले. २०१९ च्या परभवामुळे मुंडे राज्याच्या राजकारणापासून काहीशा दूर गेल्याचे पाहायला मिळाले. अखेर पक्षाने त्यांना विधानपरिषदेवर घेऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन केले. राज्यात सध्या काही अंशी मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वाद निर्माण झाल्याचे चित्र पहायल मिळत आहे. त्यामुळे ओबीसी चेहरा मुख्यमंत्रीपदासाठी पक्षाला द्यायचा असल्यास पंकजा मुंडे यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो.
हेही वाचा: Maharashtra Chief Minister: ‘मैं समंदर हूँ, लौटकर वापस आऊँगा! फडणवीसांची ‘ही’ प्रतिज्ञा खरी ठरणार?
मुरलीधर मोहोळ
मुरलीधर मोहोळ हे पुणे लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यानंतर त्यांना पक्ष नेतृत्वाने केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान दिले आहे. भाजप हा पक्ष धक्कातंत्रासाठी ओळखला जातो. राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये भाजपने अनेक अनुभवी नेते डावलून नवीन चेहऱ्याला मुख्यमंत्रीपदावर विराजमान केले होते. महाराष्ट्रात हा पॅटर्न वापरला गेला मुरलीधर मोहोळ यांचे नाव देखील समोर येण्याची शक्यता आहे. मात्र खरे काय ते पक्षाने अधिकृत नाव जाहीर केल्यावरच समोर येणार आहे. मुरलीधर मोहोळ हे मराठा समाजातून येतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचे चांगले संबंध आहेत. हिंदुत्ववादी चेहरा म्हणून देखील त्यांची ओळख आहे. त्यामुळे भाजप कोणाचे नाव जाहीर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.