मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेला पराभव भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळेच भाजपला लोकसभेत मोठा फटका बसल्याचे आरएसएसकडून बोलले जात आहे. यावरून आरएसएसने अनेकदा अजित पवारांवरही टीका केली होती. याच मुद्द्यावरून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरएसएसच्या समन्वय बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांची बाजू मांडल्याची माहिती समोर आली आहे.
– लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना सोबत घेतल्याचा भाजपला फारसा फायदा झालेला नसला तरी आगामी विधानसभा निवडणुकीकतही अजित पवारांना सोबत घेऊनच महायुती लढणार असल्याचे भाजपचे ठरले असल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.
– लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी आणि रक्षा खडसे वगळता जुने उमेदवार पराभूत झाले. पण आगामी काळात तिकीट वाटप करताना भाजप विचार करूनच तिकीटवाटप करणार आहे.
– विरोधकांच्या नॅरेटिव्हला उत्तर देण्यासाठी आरएसएसनेही मैदानात उतरायला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे.
– 2019 मध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष होता. पण एकट्याच्या मतांच्या टक्केवारीवर भाजप सत्ते येईल अशी परिस्थिती नव्हती. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना सोबत घेतले. पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी देखील ही टक्केवारी पुरेशी नसल्याचे लक्षात आले. भाजपचा मुळ मतदार आणि संघ परिवारातील अनेकांचा विरोध असतानाही आम्ही अजित पवारांना सोबत घेतले.
– राज्यातील राजकीय परिस्थितीचे वास्तव पाहून अजित पवारांना आम्ही सोबत घेतले. पण लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवारांना सोबत घेतल्याने कोणताही फायदा झाला नसल्याचे लक्षात आले. पण लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाला भाजपची 89 टक्के मते तर भाजपला शिंदे गटाची 88 टक्के मते ट्रान्सफर झाली. भाजप आणि अजित पवार यांच्यातील मतांची टक्केवारी 50 टक्क्यांपैक्षाही कमीच राहिली.
– एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर सरकारमध्ये अनेक कामे करता आली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात जी कामे झाली नव्हती ती पुन्हा सुरू करता आली. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीतही महायुती म्हणून अजित पवारांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.
– लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी आणि रक्षा खडसे वगळता जिंकलेले इतर सर्व उमेदवार नवे होते. ज्या ठिकाणी जुन्या उमेदवारांना संधी दिली त्या जागांवर भाजपचा पराभवा झाला. विरोधकांच्या खोट्या नॅरिटिव्हला संघाचा विचार पराभूत करू शकतो त्यामुळे आता संघानेही सक्रीयपणे मैदानात उतरावे अशी विनंती फडणवीसांनी केली आहे.