
धाराशिव विद्यापीठ उपकेंद्र सक्षम करण्याची मागणी; प्र-कुलगुरूंना निवेदन, ‘वन विंडो’ सेवेसह विविध सुविधांची मागणी
धाराशिव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगरचे प्र-कुलगुरू प्रवीण वक्ते यांच्या धाराशिव येथील विद्यापीठ उपकेंद्र भेटीदरम्यान विद्यापीठ विकास मंचाच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थी, पालक, प्राध्यापक आणि महाविद्यालयांना विद्यापीठाशी संबंधित सर्व कामे स्थानिक पातळीवरच उपलब्ध व्हावीत, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, धाराशिव येथे विद्यापीठ उपकेंद्राची स्थापना होऊनही अनेक प्रशासकीय आणि शैक्षणिक कामांसाठी विद्यार्थ्यांना आजही २०० ते २५० किलोमीटरचा प्रवास करून छत्रपती संभाजीनगरला जावे लागत आहे. यामध्ये परीक्षा, कागदपत्र पडताळणी, प्रमाणपत्रे, विविध शैक्षणिक परवानग्या आणि इतर प्रशासकीय प्रक्रियांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना होणारा वेळ, आर्थिक खर्च आणि गैरसोय लक्षात घेता उपकेंद्राला अधिक अधिकार आणि सुविधा देण्याची गरज असल्याचे विकास मंचाने अधोरेखित केले. उपकेंद्राची स्थापना करण्यामागील मूळ उद्देश म्हणजे विद्यापीठाच्या सेवा स्थानिक स्तरावर उपलब्ध करून देणे हा होता. मात्र, अनेक अधिकार अद्याप मुख्यालयाकडेच असल्याने उपकेंद्राच्या स्थापनेचा उद्देश पूर्णपणे साध्य झालेला नाही, असे शिष्टमंडळाने नमूद केले.
धाराशिव विद्यापीठ उपकेंद्रात ‘वन विंडो’ योजना सुरू करून विद्यापीठाशी संबंधित सर्व कार्यालयीन कामकाज स्थानिक स्तरावर उपलब्ध करावे.
विविध अर्ज, फॉर्म, महाविद्यालयांची माहिती स्वीकारण्याची सुविधा उपकेंद्रातच सुरू करावी.
मायग्रेशन प्रमाणपत्र, पदवी (डिग्री) प्रमाणपत्र आदी कागदपत्रे धाराशिव उपकेंद्रातूनच वितरित करावीत.
उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स प्रती व पुनर्तपासणी प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना उपकेंद्रातूनच सेवा उपलब्ध करून द्यावी.
उत्तरपत्रिका मूल्यमापन केंद्रात प्राध्यापकांसाठी पिण्याचे पाणी, कुलर, पंखे आणि बसण्याची व्यवस्था यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
उत्तरपत्रिका तपासणीचे काम प्राधान्याने पूर्णवेळ अनुदानित प्राध्यापकांकडूनच करून घ्यावे. संबंधित विषयाचे अनुदानित प्राध्यापक उपलब्ध नसतील तेव्हाच तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची नियुक्ती करावी, जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.
प्रत्येक प्राध्यापकाला समान प्रमाणात उत्तरपत्रिका तपासण्यासाठी देऊन मूल्यमापन प्रक्रियेत अचूकता आणि सुसूत्रता आणावी.
या निवेदनावर सिनेट सदस्य तथा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष देविदास पाठक, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी तथा विद्यापीठ विकास मंचाचे आदित्य पाटील आणि प्राचार्य प्रशांत चौधरी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान, प्र-कुलगुरू प्रवीण वक्ते यांनी शिष्टमंडळाच्या मागण्यांची दखल घेत सकारात्मक निर्णय लवकरच घेतला जाईल, असे आश्वासन दिले.