शासनाच्या दिनदर्शिकेला हरताळ? धाराशिवमध्ये 26 ऐवजी 25 जूनलाच साजरी केली शाहू महाराज जयंती
माहितीनुसार, २५ जून रोजी सामाजिक न्याय दिन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम आयोजित करून त्यालाच राजर्षी शाहू महाराज जयंतीचे स्वरूप देण्यात आले. यामागे २७ व २८ जूनच्या शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांसह सलग तीन दिवसांची सुट्टी मिळावी, या उद्देशाने कार्यक्रम मुद्दाम आगाऊ उरकण्यात आल्याची चर्चा प्रशासनात आणि सामाजिक वर्तुळात सुरू आहे.
शासनाने निश्चित केलेल्या स्मृतिदिन व जयंती कार्यक्रमांच्या तारखांमध्ये स्वतःहून बदल करण्याचा अधिकार कोणत्याही जिल्हा कार्यालयाला नसतो.
शासनाच्या आदेशाचे किंवा विभागीय सूचनांचे उल्लंघन झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते.
वरिष्ठांच्या निर्देशांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे हे शासकीय कर्तव्यातील कसूर मानले जाऊ शकते.
महापुरुषांच्या जयंतीसारख्या अधिकृत शासकीय कार्यक्रमात नियमबाह्य निर्णय घेतल्यास त्याबाबत विभागीय चौकशी करण्याचा अधिकार शासनाला आहे.
या प्रकारामुळे सामाजिक न्यायाचा संदेश देणाऱ्या विभागानेच शासनाच्या आदेशाला हरताळ फासल्याची टीका होत आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीसारखा अधिकृत कार्यक्रम सोयीसाठी आगाऊ घेणे हे केवळ प्रशासकीय हलगर्जीपणाच नव्हे, तर शासनाच्या निर्देशांचा अवमान असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणाची विभागीय आयुक्त, सामाजिक न्याय आयुक्तालय किंवा शासनस्तरावर सखोल चौकशी करून जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, तसेच अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांकडून केली जात आहे.
शिंदे गटात प्रवेशापूर्वीच ‘गेम’ झाला? Omraje Nimbalkar यांच्यामुळे भाजपचे बसवराज पाटील विजयी?






