सोलापूर / शेखर गोतसुर्वे : सोलापूर जिल्हा परिषदेचे (Solapur ZP) प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर (Sandip Kohinkar) यांनी गेल्या दीड महिन्यामध्ये गेल्या सहा महिन्यापासून प्रलंबित असलेल्या सुमारे 100 कोटींपर्यंत प्रशासकीय फायलींचा निपटारा केला आहे. त्यामुळे जिल्हाभर कोहिनकर पॅटर्नची आता चांगली चर्चा रंगली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना यापूर्वीच पदोन्नती मिळाली आहे. या पदोन्नतीच्या पायाभूत प्रशिक्षणासाठी गेल्या महिन्यात ते मसूरीला प्रशिक्षणासाठी गेले होते या काळात त्यांचा पदभार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्याकडे देण्यात आला होता. सीईओ स्वामी यांनी प्रशिक्षण संपवून कोहिनकर यांच्याकडून शनिवारी पदभार स्वीकारला. त्यानंतर सीईओ स्वामी यांनी विभागप्रमुखांची बैठक घेऊन ‘मार्च एन्ड’च्या कामाचा आढावा घेतला. त्यावेळी सर्व विभागप्रमुख आणि कामे अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितल्यावर ते आवक झाले. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींनी कोहिनकर यांच्याशी संवाद साधला.
दीड महिन्यामध्ये विकासकामाबाबत कोणाचीही तक्रार आली नाही. याकाळात जवळपास १०० कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये विशेषत: समाज कल्याण विभागाच्या ५२ कोटींच्या कामांना प्रशासकीय मंजूरी देण्यात आली. तसेच जलसंधारण विभाग १० कोटींच्या आसपास कामाना मंजुरी देण्यात आली.
तसेच कृषी विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा योजना याचे लाभार्थी देखील जवळपास निश्चित झाले आहेत. आरोग्य, शिक्षण या विभागाच्या कामाला मंजूरी देण्यात आली. त्यामुळे मार्च महिन्याच्या शेवटी जवळपास ९५ टक्के निधी खर्च करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे माझ्या कार्यकाळात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य भरतीची प्रक्रिया देखील झाली असल्याची माहिती कोहिनकर यांनी दिली.
कोहिनकर पॅटर्नची चर्चा
कोहिनकर यांनी दीड महिन्यामध्ये जे काम केले त्याचा लळा जिल्हा परिषदेचे सर्व विभाग, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, कर्मचारी यांना लागला आहे. शंभर कोटींची कामे वाटप झाली. पण त्याबाबत एकही तक्रार आली नाही, हे विशेष तसेच जलजीवनच्या कामाबाबत यापूर्वी बऱ्याच तक्रारी झाल्या होत्या. पण कोहिनकर यांनी १७० फायली हातोहात निकाली काढल्या. विकासकामांच्या फायली हाता वेगळ्या करण्याबाबत यापूर्वीची जी पद्धत होती, ती पद्धतच त्यांनी मोडीत काढली. त्यामुळे ठेकेदारांमध्ये हा चर्चेचा विषय झाला आहे.
का होतेय चर्चा…
कोहिनकर पॅटर्नची जिल्हा परिषदेत पुढील कारणांसाठी चर्चा होत आहे. यापूर्वी कोणतीही फाईल आली चर्चा करा पाहून घ्या विभागप्रमुखांनी यावर विचार करावा, असा शेरा मारला जात होता. पण कोहिनकर यांनी विभाग प्रमुखांनी पाठवलेली फाईल थेट मंजूर केली. लोक थेट कोहिनकर यांना भेटत होते. त्यावर विभागप्रमुखांना संपर्क साधून फाईल मागवली जात होते व हातावेगळे वेगळे केले जात होते. त्यामुळे त्यांच्या टेबलावर एकाही फायलीचा ढिगारा दिसला नाही. कार्यालयात रात्री उशिरापर्यंत बसून येणाऱ्या प्रत्येकाला ते थेट भेटत होते. यामुळे माझे काम राहिले अशी कोणीही तक्रार केलेली नाही.