फोटो सौजन्य - Social Media
मुंबईत आझाद मैदानात मराठा आंदोलकांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आपले आरक्षण मिळवण्यासाठी आलेले मराठा तरुणांच्या आंदोलनाचा परिणाम संपूर्ण मुंबईवर जाणवताना दिसून येत आहे. काही मराठी तरुण बृहन्मुंबई पालिकेच्या बाहेर कबड्डी खेळताना दिसून येत आहेत तर काही खो खो खेळात आहेत.अगदी रस्त्यावर अंघोळी करत आहेत. CSMT रेल्वे स्थानकांवर जेवणाच्या पंगती बसत आहेत तर तरुण ठेक्यावर बागडत आहेत. या सगळ्याचा परिणाम मुंबईच्या व्यवस्थेवर होत आहे. याचा धक्का अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीला बसला असल्याचे दिसून येत आहे. तसेच त्याच संबंधित तिने पोस्टही केली आहे.
इंस्टाग्राम पोस्टमध्ये तिने नमूद केले आहे की, आज दुपारी १२:३० वाजता कोलाबाहून फोर्टकडे जाताना अचानक माझी कार एका जमावाने अडवली. भगवा अंगरखा घातलेला एक माणूस बोनटवर जोरजोरात बडवू लागला, खिदळत माझ्याकडे पाहत होता आणि स्वतःचं पोट कारला टेकवत अंग हलवत जणू काही विकृत सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होता. त्याचे मित्र गाडीच्या काचांवर बडवून “जय महाराष्ट्र!” ओरडत हसत होते. फक्त पाच मिनिटांत हे प्रसंग दोनदा घडले. ना पोलीस, ना कायदा, ना सुव्यवस्था, उलट जे पोलीस दिसले ते फक्त गप्पा मारत बसलेले. दुपारी उजेडात, दक्षिण मुंबईसारख्या भागात, स्वतःच्या गाडीत मी असुरक्षित वाटत होते. रस्त्यांची अवस्था बघण्याजोगी केळीच्या साली, प्लास्टिकच्या बाटल्या आणि घाणीने भरलेली. फूटपाथ व्यापून आंदोलनकर्ते तिथेच खाणं, झोपणं, आंघोळ करणं, स्वयंपाक करणं, लघुशंका व मलमूत्रविसर्जन करणं, व्हिडिओ कॉल करणं, रील्स बनवणं, अगदी “मुंबई दर्शन” करणं हे सगळं आंदोलनाच्या नावाखाली सुरू होतं. नागरी भानाचा हा अक्षरशः खेळखंडोबा होता.
या पोस्टखाली कॅप्शनमध्ये तिने सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचा दावा केला जातो, पण प्रत्यक्षात तसं काही जाणवत नाही. प्रगत समाज होतोय असंही वाटत नाही आणि सतत बोलला जाणारा डिजिटल भारत अजिबात जाणवत नाही. कारण आजही जातिवाद, धर्म, राजकारण, भ्रष्टाचार, नोकरशाही, निरक्षरता आणि बेरोजगारी या सगळ्यांनीच समाजाचं आणि देशाचं सूत्र हाती घेतलं आहे. अशा परिस्थितीत याला विकास म्हणणं हा फसवा आभास ठरेल. खरा विकास म्हणजे सर्वसामान्यांच्या जीवनमानात सुधारणा, समान संधी आणि पारदर्शक व्यवस्था; पण आज जे काही घडत आहे त्याला विकास नव्हे तर अधःपतनच म्हणावं लागेल.” असे नमूद केले आहे. पोस्टखाली तिच्या चाहत्यांनी हालापेष्टांची विचारणा केली आहे.