अकलूज : प्रत्यक्ष ईश्वर कधीही पाहिला नसला तरी हिंदू धर्मामध्ये त्याचे प्रतिक म्हणून चिन्हे आणि मुर्तीची पूजा भक्तिभावाने केली जाते. घरात आणलेली मूर्ती श्रध्देने पुजली जाते, जतन केली जाते, तिचं पावित्र्य राखलं जातं. काही कारणास्तव मूर्तीची, चिन्हांची किंवा फोटोंची तुटफुट झाल्यास या गोष्टी आपणास वाहत्या पाण्यात प्रवाहित करण्यास सांगितल्या जातात. या अशाच प्रवाहित करण्यात आलेल्या मूर्तीचा निरा नदीच्या पात्रात खच लागला आहे. जनावरे, माणसे या मूर्ती तुडवत फिरत असल्याने यांची विटंबना होत आहे.
काही महिन्यांपूर्वी गणेशोत्सव पार पडला. यावेळी सोलापूर जिल्हा हद्दीमध्ये निरा नदीच्या पात्रात गणेश मुर्तीचे विधीवत विसर्जन करण्यात आले. परंतु या मुर्ती नदी किनाऱ्या लगतच विसर्जित करण्यात आल्याने त्या प्रवाहित झाल्या नाहीत. अर्धवट विरघळलेल्या या मुर्तीचा खच नदी पात्रात साठला आहे. त्यामुळे अनन्य भक्तिभावाने ज्या गणेशाची आपण आराधना केली. त्याच गणेशाची अशी अवस्था बघून मन हेलावून जाते. नदीच्या गाळात, गायी गुरांच्या शेणात, काटेरी झुडपांत या मूर्ती इतरत्र पडलेल्या आहेत.
अनेक देवदेवतांच्या प्रतिमा, लाकडी देव्हारे, मुर्त्या निरा नदीच्या पात्रात विखुरलेल्या अवस्थेत पडल्या आहेत. लवकरच संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सराटी या गावी मुक्कामी येणार आहे. निरेच्या पात्रात तुकाराम महाराजांच्या पादुकांना स्नान घालून नंतर हा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करतो. पण आज असे दृष्टीला पडले की, खरोखरच हिंदू धर्मामध्ये मूर्तीपूजेचे महत्व लोकांना राहिले आहे की नाही असा प्रश्न पडतो.
निरेच्या पात्रामध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती मोडतोड झालेल्या अवस्थेत ठेवलेली दिसली. ज्या ज्ञानोबा माऊलींचा जयघोष करत देशाच्या काना कोपऱ्यातून वैष्णवांची मांदियाळी पंढरपुरला येते. त्याच ज्ञानोबा माऊलीच्या मूर्तीची ही अशी विटंबना पाहवत नाही. ज्या कोणी ही मूर्ती पाण्यामध्ये विसर्जित केली आहे, त्यांनी ती विसर्जित करताना पुरेपुर काळजी घेणे गरजेचे होते. पण तसे झाले नसल्याचे यातून दिसत आहे.