खालापूर : आजची सकाळी महाराष्ट्रासाठी एक दु:खद बातमी घेऊनच आली. रायगड (Raigad landslide) जिल्ह्यात ईर्शाळगडाच्या (Irshalgad) पायथ्याशी असलेल्या ईर्शाळवाडीवर डोंगराची दरड कोसळली असून, मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 10 जणांचा ( 10 deaths) मृत्यू झाला असून 100 जणं या ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. ईर्शाळवाडीत एकूण 48 घरं असून त्यातल्या 18 घरांवर दरड कोसळली असल्याचं सांगण्यात येतंय. गावाची लोकसंखअया 227 च्या आसपास आहे. त्यातील 80 जण सुखरुप असल्याचं समोर आलं आहे. तर 10 जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. उर्वरित 100 जणं या ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. या दुर्घटनेत 21 जणं जखमी झाल्याची माहितीही देण्यात आलीय. तसेच मृत्यांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गर्दी करु नका – प्रशासन
दरम्यान, सकाळी बचावकार्य सुरु असताना पहाटे पाच वाजता दम लागल्याने अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आणखी एका जवानाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. येथे बचावकार्य सुरु असताना, मोठ्या प्रमाणात स्थानिकांची गर्दी होत आहे, बचावकार्यासाठी अडथळा येतोय, त्यामुळं स्थानिकानी, नागरिकांनी येथे गर्दी करु नये, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
राजकीय नेत्यांची गर्दी
या घटनेची गांभीर्यता पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह अनेक मंत्री घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, इर्शाळवाडी येथे झालेल्या घटनेनंतर मुख्यमंत्री शिंदे, मंत्री उदय सामंत, मंत्री अनिल पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादा भुसे, मंत्री अदिती तटकरे यांच्यासह विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील उपस्थित होते. त्यांनी घटनेची माहिती घेऊन प्रशासनाला योग्य त्या सूचना केल्या. तर आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे व आमदार अनिल परब हे देखील इर्शाळवाडी येथे जाणार आहेत. एकिकडे बचावकार्य अनेक अडचणी व अडथळे येत असताना, येथे मात्र राजकीय नेत्यांची गर्दी पाहयला मिळत आहे. त्यामुळं स्थानिकांना मदत मिळणे गरजेचं आहे, त्यांचा जीव वाचण महत्त्वाचे आहे, अस असताना राजकीय नेत्यांची गर्दी कशासाठी? असा सवाल विचारला जात आहे.
इयरलिफ्ट करण्याचा विचार
पावसाचा जोर अजून अधिक प्रमाणात वाढल्या कारणाने हेलीकॉप्टरने बचावकार्य करण्याची शक्यता अजून लांबणीवर गेली आहे. तसेच ईर्शाळगडाजवळ हेलिकॉप्टर तसेच जेसीबीही नेण्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळं गडावर जाण्यासाठी पायी रस्ता आहे, तो मोठ्या प्रमाणात निसरड आहे. त्यामुळं अग्निशमन दलाला देखील तिथे पोहचण्यास अडथळे येताहेत. अजूनही प्रचंड पाऊस पडत आहे. सकाळी पाच वाजता बचावकार्य सुरु असताना, गडावर पोहचत असताना, दम लागल्यानं अग्निशमन दलातील एका जवानाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं येथे इयरलिफ्ट करण्याचा विचार होऊ शकतो का, यावर चर्चा सुरु असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.