Photo Credit- Social Media तुम्हाला महाराष्ट्राचे वातावरण बिघडवायचे आहे का? संजय सिंहांचा फडणवीसांना थेट सवाल
पुणे: ‘सेन्सॉर बोर्डाकडून फुले चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे.महात्मा ज्योतीबा फुले आणि माता सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. समाजातील वंचित-मागासवर्गीय समाजाला, विशेषकरून महिला- मुलींना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष चित्रित करण्यात आला आहे. त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा हाच प्रवास सांगणारा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारकडून त्यावर बंदी घातली जाते. सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंच्या या चित्रपटात त्यांच्यावर झालेल्या अन्याय आणि त्यांना ब्राह्माणांनी केलेली मदत हे दोन्ही दाखवण्यात आले आहे. त्यामुळे ‘फुले’ चित्रपट जसा बनवला आहे, त्यात कोणताही कट न करता तो चित्रपट प्रदर्शित केला जावा, अशी आमची मागणी आहे. त्या चित्रपटाचे दिग्दर्शकही ब्राह्मण आहेत, असही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
संजय सिंह आज पुणे दौऱ्यावर आले होते. माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यातील भाजप सरकारवरही जोरदार निशाणा साधला. या देशात केरला स्टोरी, काश्मिर फाईल सारखे चित्रपट बनू शकतात. चुकीचे समज पसरवणारे चित्रपटही बनवले जातात. चित्रपटाचे दिग्दर्शक माफी मागतात, असेही चित्रपट आहेत,’ असे चित्रपट बनू शकतात तर फुलेंचा चित्रपट का नाही बनू शकत. असा सवाल उपस्थित करत आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी मोदी सरकारचा निषेध केला आहे. राजस्थानात विरोधी पक्षाचे नेते राममंदिरात गेले तर मंदिराची साफसफाई कऱण्यात आली. स्वातंत्र्यानंतरही आम्हाला असे दिवस बघावे लागत आहेत, असं म्हणत त्यांनी निषेध व्यक्त केला.
संजय सिंह म्हणाले, आम आदमी पक्ष संपू्र्ण देशभरात पक्षाचे संघटन वाढवण्यासाठी कार्यरत आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव आम्हाला मान्य आहे. पण निवडणुकीनंतर अवघ्या दोन महिन्यात दिल्लीची अवस्था खूप खराब झाली आहे. हाच भाजपचा खरा चेहरा आहे. हेच मी या देशाला सांगू इच्छितो, की ज्या ज्या ठिकाणी तुम्ही भाजपला निवडून द्याल, तिथे ना तुम्हाला पाणी मिळणार ना वीज मिळणार, ना शिक्षा मिळणार, ना आरोग्य व्यवस्था मिळणार. जिथे बीजेपी असेल तिथे फक्त तुम्हाला दंगली, जाळपोळ असेच मिळणार आहे.अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
महाराष्ट्रातही हेच सुरू आहे. रामनवमीच्या दिवशी सुरू असलेल्या मिरवणुकीत आईला शिवी देणारे गाणे थेट डीजेवर वाजवले जात आहे. हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिसत नाही का, तुम्ही महाराष्ट्राचे वातावरण बिघडवू इच्छिता का, महाराष्ट्राला हिंसाचाराच्या दरीत लोटण्याचा प्रयत्न करत आहात का, इथली कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याची तुमची इच्छा आहे का, असा खडा सवालही त्यांनी राज्य सरकारला केला. संजय सिंह म्हणाले, सामाजिक सुधारणा आणि पुरोगामी अशी जगभरात महाराष्ट्राची ओळख आहे. मोठमोठ्या आंदोलनांसाठी, बंधुभावासाठी महाराष्ट्र ओळखला जातो, पण आज महाराष्ट्राचे वातवरण पूर्णपणे बिघडून गेलं आहे.
लाडक्या बहिणींना आता मिळणार फक्त 500 रुपये? सत्ताधारी नेत्यांनी दिलं स्पष्टीकरण
दिल्लीचे लोक आतापासूनच पश्चाताप करू लागले आहेत. शाळांमध्ये आतापासूनच ८० टक्क्यांपर्यंत फीस वाढल्या आहेत. गेल्या १० वर्षांत एवढी फी कधीच वाढली नव्हती. हाच भाजप आणि आम आदमी पक्षातला फरक आहे. जिथे आम्ही असू तिथे पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य सुविधा फ्रीमध्ये देऊ. पण जिथे बीजेपी असेल तिथे तुम्हाला फक्त गुंडगिरी, हिंसाचार, दंगली, जाळपोळ हेच मिळणार आहे, असा टीकाही त्यांनी यावेळी केली.
वफ्क सुधारणा विधेयक हे भाजप देशातील जनतेसाठी सर्वात मोठा घोटाळा आहे. जमीनीवर ताबा मिळवणे हा यामागचा मोठा उद्देश आहे. ज्यांनी काशीमध्ये ३०० हून अधिक मंदिरे पाडली आहे. याच तोडलेल्या मंदिरांमधील शिवलिंग पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते. याच लोकांना वाराणसीतील संरक्षण विभागाची जमीन उद्योगपती मित्र गौतम अडानींना देऊन टाकली. म्हणूनच धार्मिक स्थळांच्या जमिनीवर कब्जा करण्यासाठीच हे वक्फ सुधारणा विधेयक तयार करण्याचा घाट घातल्याचा आरोपही संजय सिंह यांनी यावेळी केला.