सौजन्य - नवराष्ट्र टीम
चाकण/अतिश मेटे : महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्राची सद्यस्थिती, उद्योगांचे स्थलांतर, रोजगाराचा प्रश्न आणि औद्योगिक वसाहतींमधील पायाभूत सुविधांच्या दुरवस्थेवरून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी चाकण एमआयडीसी परिसरातील विविध समस्यांकडे लक्ष वेधत एमआयडीसी आणि पीएमआरडीएच्या कारभारावरही गंभीर आरोप केले. उद्योगमंत्री येतील, मोठ्या घोषणा करतील; मात्र जमिनीवरील वास्तव वेगळे आहे, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. चाकण एमआयडीसी परिसरातील रस्ते, कचरा, वीजपुरवठा आणि अन्य मूलभूत सुविधांच्या समस्यांची पाहणी करत त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
३५ हजारांहून अधिक उद्योग बंद अथवा स्थलांतरित झाल्याचा दावा
महाराष्ट्रातील सुमारे ३५ हजार ३०० उद्योग बंद पडले अथवा राज्याबाहेर स्थलांतरित झाले, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला. उद्योगांचे स्थलांतर होत असल्याने त्याचा थेट परिणाम रोजगाराच्या संधींवर होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आणखी सुमारे २० उद्योजक राज्याबाहेर जाण्याचा विचार करीत असल्याचा दावाही त्यांनी केला. “उद्योग टिकवणे, नवीन गुंतवणूक आणणे आणि तरुणांसाठी रोजगार निर्माण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र उद्योगांसाठी आवश्यक असलेले पोषक वातावरण निर्माण करण्यात सरकार अपयशी ठरत आहे,” अशी टीका ठाकरे यांनी केली.
रोजगाराच्या प्रश्नावरून सरकारला सवाल
तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्नावरही आदित्य ठाकरे यांनी सरकारला घेरले. राज्यात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची गरज असताना उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधी त्या तुलनेत कमी असल्याचा दावा करत त्यांनी तरुणांच्या भवितव्याबाबत सरकारने गांभीर्याने विचार करण्याची गरज व्यक्त केली. तरुणांना रोजगार मिळाला नाही तर त्यांनी जायचे कुठे? असा सवाल उपस्थित करत उद्योग बंद होणे किंवा स्थलांतरित होणे ही केवळ उद्योजकांची समस्या नसून त्याचा परिणाम हजारो कुटुंबांच्या उपजीविकेवर होत असल्याचे ठाकरे यांनी नमूद केले.
चाकण एमआयडीसीतील रस्ते, कचरा आणि वीजप्रश्न ऐरणीवर
चाकण एमआयडीसी परिसरातील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांकडेही त्यांनी लक्ष वेधले. औद्योगिक परिसरात ठिकठिकाणी कचरा साचणे, रस्त्यांची दुरवस्था आणि वीजपुरवठ्याच्या समस्यांमुळे उद्योगांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिकसह राज्यातील अन्य औद्योगिक क्षेत्रांमध्येही अशाच प्रकारच्या समस्या असल्याचा दावा त्यांनी केला. औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी विविध शासकीय विभागांमध्ये समन्वय आवश्यक असताना प्रत्यक्षात त्याचा अभाव दिसून येत असल्याची टीकाही त्यांनी केली.
प्रोटोकॉल बाजूला ठेवून एमआयडीसीतील वास्तव पाहावे
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दौऱ्यावर भाष्य करताना आदित्य ठाकरे यांनी त्यांना प्रोटोकॉल बाजूला ठेवून औद्योगिक परिसरातील प्रत्यक्ष परिस्थिती पाहण्याचे आवाहन केले. नागरिकांच्या समस्या समजून घ्यायच्या असतील, तर प्रोटोकॉल आणि सुरक्षेचा बडेजाव बाजूला ठेवून सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे एमआयडीसी परिसरात फिरावे. तेव्हाच प्रत्यक्ष परिस्थिती समोर येईल, असे ठाकरे म्हणाले.
एमआयडीसी, पीएमआरडीएच्या कारभारावर आरोप
एमआयडीसी आणि पीएमआरडीएच्या कारभारावरही ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले. प्रशासनातील विविध कामांसाठी कथितरीत्या दर ठरलेले असल्याचा आरोप करत त्यांनी या प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी केली. मात्र या आरोपांबाबत संबंधित प्रशासन आणि सरकारची अधिकृत भूमिका काय आहे, याकडे आता लक्ष लागले आहे.
हे सुद्धा वाचा : आंतरराज्य सोनसाखळी चोरट्यांना अटक; पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेची मोठी कामगिरी
चाकणसाठी सक्षम अधिकाऱ्याची मागणी
चाकण एमआयडीसीसारख्या मोठ्या औद्योगिक क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी सक्षम, कठोर आणि निर्णयक्षम अधिकाऱ्याची आवश्यकता असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. “चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढे यांच्यासारख्या खमक्या अधिकाऱ्याची गरज आहे,” असे ते म्हणाले. यावेळी आमदार बाबाजी काळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आरोपांमुळे चाकण एमआयडीसीतील उद्योग, रोजगार आणि पायाभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या आरोपांवर उद्योग विभाग, एमआयडीसी आणि संबंधित प्रशासनाकडून काय स्पष्टीकरण दिले जाते, याकडे उद्योग क्षेत्रासह स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.