
'घटनेसाठी जबाबदार कोण?' शास्त्रीनगर रुग्णालयातील प्रकारानंतर व्हायरल पोस्टमधून व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
अहवालानुसार, शिंदे सेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या साथीदारांनी डॉक्टरांना मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला तसेच रुग्णालयात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी रुग्णालयात कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक आणि पोलीस संरक्षण उपलब्ध करून देण्याची शिफारसही करण्यात आली आहे.
Kalyan : KDMC पुस्तकावरून नवा वाद! आगरी-कोळी समाजाचा अपमान झाल्याचा आरोप, चौकशीची मागणी
अहवालात घटनेची पार्श्वभूमीही स्पष्ट करण्यात आली आहे. संबंधित गर्भवती महिलेच्या सोनोग्राफीमध्ये बाळाच्या गळ्याभोवती नाळेचे दोन वेढे असल्याचे आढळले होते. अशा परिस्थितीत नवजात बाळाला अतिदक्षता विभागात ठेवण्याची आवश्यकता निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र, त्या वेळी शास्त्रीनगर रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागातील सर्व बेड भरलेले असल्याने संबंधित महिलेला पुढील उपचारांसाठी मुंबईतील शीव येथील सरकारी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. याच निर्णयामुळे महिलेच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर नगरसेवक रमेश म्हात्रे यांना बोलावण्यात आले आणि त्यानंतर रुग्णालयात गोंधळ व डॉक्टरांना मारहाणीची घटना घडल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
या घटनेनंतर संबंधित गर्भवती महिलेला त्याच रात्री कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली प्रसूतीगृहात हलविण्यात आले. तेथे शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती करण्यात आली. नवजात मुलीच्या गळ्याभोवती नाळेचे वेढे असल्यामुळे तिला पुढील उपचारांसाठी खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. उपचारानंतर पाच दिवसांनी आई आणि बाळाला घरी सोडण्यात आले.
डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणातील सोशल मीडियावरील व्हायरल पोस्ट
या घटनेदरम्यान सोशल मीडियावर एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये डॉक्टरांवरील मारहाणीचे समर्थन करण्यात आलेले नसल्याचे स्पष्ट करत, घटना घडण्यामागे आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी होत्या का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, गर्भवती महिलेवर वेळेत उपचार झाले असते, तिला दुसऱ्या रुग्णालयात जाण्यास सांगावे लागले नसते किंवा तिच्या वेदनांकडे वेळेत लक्ष दिले गेले असते, तर कदाचित हा वाद निर्माण झाला नसता. तसेच गरीब रुग्णांच्या उपचारांबाबतची यंत्रणेची जबाबदारी आणि कार्यपद्धती यावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
मात्र, या पोस्टमधील दावे हे सोशल मीडियावर प्रसारित होत असलेले मत किंवा आरोप आहेत. त्यांची अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही. दुसरीकडे, अधिकृत वैद्यकीय अहवालात डॉक्टरांवरील हल्ला आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा उल्लेख करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.