Dombivli Rasrang Dandiya 2026: शेतकऱ्यांच्या मदतीसाठी श्रीकांत शिंदेंचा मोठा निर्णय; यंदाचा ‘रासरंग दांडिया’ रद्द
डोंबिवलीतील नवदुर्गा मित्र मंडळ आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी डोंबिवली येथील डी. एन. सी. शाळेच्या मैदानात ‘रासरंग’ दांडिया उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात येते. डोंबिवलीसह कल्याण-डोंबिवली, ठाणे, उल्हासनगर, अंबरनाथ तसेच परिसरातील हजारो नागरिक या उत्सवात सहभागी होत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून रासरंग हा डोंबिवलीतील नवरात्रोत्सवातील प्रमुख आकर्षण ठरला असून दांडिया रसिकांसाठी या उत्सवाची विशेष उत्सुकता असते.
मात्र, यंदा महाराष्ट्रातील शेतकरी बांधव अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहेत. अनेक भागांमध्ये पावसाच्या अनियमिततेमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. वर्षभर कष्ट करून उभे केलेले पीक हातचे गेल्याने अनेक कुटुंबांच्या उत्पन्नाचा आधारच हिरावला गेला आहे. शेतकऱ्याचे हे नुकसान केवळ एका कुटुंबापुरते मर्यादित नसून त्याचा परिणाम संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होत असतो.
या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यंदा रासरंगचा भव्य उत्सव न करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी संकटात असताना त्याच स्वरूपात मोठा उत्सव साजरा करणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका या निर्णयामागे आहे. उत्सवासाठी होणारा खर्च हा यंदा संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी वापरला जाणार असून, उत्सवाच्या माध्यमातून निर्माण होणारा आनंद यंदा शेतकऱ्यांच्या मदतीतून वाटण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही संकटग्रस्त शेतकरी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली आहे. नुकताच त्यांनी अकोला, बुलढाणा आदी भागांतील शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. संकटग्रस्त कुटुंबांना मदत करताना त्यांच्या मुलांचे शिक्षण, मुला-मुलींचे विवाह तसेच अन्य कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्येही मदतीचा हात देण्याची भूमिका त्यांनी मांडली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या माध्यमातूनही शेतकरी कुटुंबांना शक्य ती मदत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
याच सामाजिक बांधिलकीतून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रासरंग उत्सवाबाबत हा निर्णय घेतला आहे. दरवर्षी उत्सवाच्या आयोजनासाठी करण्यात येणाऱ्या निधी संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वळविण्यात येणार असून, नवदुर्गा मित्र मंडळ आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना भरीव निधी देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कोणत्या भागातील शेतकऱ्यांना आणि कोणत्या स्वरूपात मदत अधिक परिणामकारकपणे पोहोचविता येईल, याबाबतचे नियोजन सध्या सुरू आहे. मदत प्रत्यक्ष गरजू शेतकरी कुटुंबांपर्यंत पोहोचावी, यासाठी नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेऊन त्यानुसार मदतीचे स्वरूप निश्चित केले जाणार आहे. या मदतीबाबतची सविस्तर माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे आमदार राजेश मोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यंदा रासरंगचा भव्य जल्लोष होणार नसला तरी नवरात्रोत्सवाची परंपरा कायम ठेवण्यात येणार आहे. साधेपणाने देवीची घटस्थापना, पूजा आणि आराधना केली जाणार आहे. उत्सव दरवर्षी साजरे करता येतात; मात्र संकटाच्या काळात आपल्या अन्नदात्याच्या पाठीशी उभे राहण्याची वेळ आली असताना त्याला प्राधान्य देणे अधिक महत्त्वाचे आहे. यंदा रासरंगच्या माध्यमातून होणारा जल्लोष बाजूला ठेवून शेतकरी कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची भावना खासदार डॉ. शिंदे याची व्यक्त केली आहे. महाराष्ट्राचा शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे तो संकटात असताना त्याच्या पाठीशी उभे राहणे ही समाज म्हणून आपली सामूहिक जबाबदारी आहे. याच भावनेतून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यंदाच्या रासरंग दांडिया उत्सव रद्द करत शेतकरी बांधवांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.






