सांगली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : सांगलीच्या नवे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. मंताडा राजा दयानिधी (Mantada Raja Dayanidhi) यांची नियुक्ती झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची संभाजीनगर (औरंगाबाद) महानगरपालिका आयुक्तपदी बदली झाली आहे. डॉ. दयानिधी हे उल्हासनगर महापालिकेचे आयुक्तपदी कार्यरत होते. नवे जिल्हाधिकारी म्हणून शनिवारी सकाळी पदभार स्वीकारणार असल्याचे समजते.
डॉ. चौधरी हे फेब्रुवारी २०१९ मध्ये सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून रूजू झाले होते. दोन महापुर, कोरोनासह अनेक संकटात जिल्हाधिकारी म्हणून डॉ. चौधरी यांनी चांगले काम केले. प्रशासकीय शिस्त आणण्याचा प्रयत्न केला. त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांच्या बदलीबाबत अनेक दिवसांपासुन चर्चा होती. काही दिवसांपूर्वी डॉ. चौधरी यांची बदली झाली होती. मात्र, त्यानंतर स्थगिती देण्यात आली होती. शुक्रवारी बदलीबाबतचा अंतिम निर्णय झाला. डॉ. चौधरी यांची संभाजीनगर आयुक्तपदी बदली झाली आहे.
सांगलीच्या नूतन जिल्हाधिकारी डॉ. मंताडा राजा दयानिधी हे २०१४ च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत. ते मूळ आंध्रप्रदेशमधील मंताडा या गावातील आहेत. सध्या ते उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांनी यापूर्वी गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे. डॉ. दयानिधी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम केले आहे. त्यानंतर प्रथमच महसूल विभागात त्यांची नियुक्ती झाली आहे.