
janakrosh dushkal morcha congress
Drought News : राज्यात दुष्काळाच्या प्रश्नामुळे चिंतेचं वातावरण आहे. यंदा पावसाने साथ न दिल्यामुळे राज्यात पाणीटंचाईचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पुरेश्या पावसाअभावी राज्यात शेतकरीवर्ग हवालदिल झाला असल्याचे चित्र दिसत आहे. अश्यातच आता कांग्रेस शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरली आहे. काँग्रेसकडून शेतकऱ्यांसाठी जनआक्रोश दुष्काळ मोर्चा काढण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्राचे प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी जनआक्रोश दुष्काळ मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, सरसकट कर्जमाफी आणि हेक्टरी एक लाख रुपये अनुदान देण्याची मागणी करण्यात आली. काँग्रेस नेत्यांनी भाजपा महायुती सरकारच्या दुष्काळ निवारणाच्या भूमिकेवरही जोरदार टीका केली.
मोर्चाला संबोधित करताना डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा मुद्दा उपस्थित केला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असल्याचा दावा करत त्यांनी सरकारच्या मदतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
सोयाबीनचा भाव वाढला, पण शेतकऱ्यांच्या हातात पैसाच नाही! वर्ध्यातील बाजारभावामुळे चर्चेला उधाण
उद्योगपतींच्या कर्जमाफीचा संदर्भ देत त्यांनी शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांचे कर्ज माफ करण्यास सरकारला काय अडचण आहे, असा सवाल केला. दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सरकारने गांभीर्याने घ्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यंदाच्या खरीप हंगामातील नुकसानीचा मुद्दा उपस्थित केला. शेतकरी अस्मानी संकटाचा सामना करत असताना सरकारी पातळीवरील मदतीबाबतही त्यांना प्रतीक्षा करावी लागत असल्याचे ते म्हणाले.
दिवाळीसाठी शेतकऱ्यांना पाच हजार रुपये देण्याच्या निर्णयावर टीका करत सपकाळ यांनी ही मदत अपुरी असल्याचे म्हटले. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी सरसकट कर्जमाफी आणि हेक्टरी एक लाख रुपये अनुदान देण्याची मागणी केली.
काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांना मदत देताना सर्वेक्षण आणि पंचनाम्यांची प्रतीक्षा न करता तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय शेतमजुरांना सानुग्रह अनुदान, मनरेगाची कामे सुरू करणे, शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करणे आणि विद्यार्थ्यांना मोफत एसटी पास देण्याची मागणी करण्यात आली.
जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करणे, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर उपलब्ध करणे आणि सावकारांकडून होणारा कथित जाच थांबवणे, या मुद्द्यांचाही मोर्चात समावेश होता.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि CWC सदस्य बाळासाहेब थोरात यांनी मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले. खरीप हंगामातील नुकसान आणि रब्बी पिकांबाबतची अनिश्चितता यामुळे शेतकरी, शेतमजूर आणि पशुधन अडचणीत असल्याचे ते म्हणाले.
जिरायती आणि बागायती शेतीसाठी किती मदत दिली जाणार, हे सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी थोरात यांनी केली. बँका, वित्तीय कंपन्या आणि सावकारांच्या वसुलीचा तगादा थांबवण्याची मागणी करत त्यांनी सरकारी निधीचा उपयोग शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी करावा, असे आवाहन केले.
या मोर्चात खासदार डॉ. कल्याण काळे, खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, खासदार प्रा. रविंद्र चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि नागरिक सहभागी झाले होते. आता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांवर राज्य सरकार काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.