Devendra Fadnavis
जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) हे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत. ‘सगेसोयरे’ शब्दासह मराठा आरक्षण देण्यात यावे, अशी जरांगे पाटील यांची मागणी आहे. त्यावरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठं विधान केलं आहे. ‘मनोज जरांगे यांची ‘सगेसोयरे’संदर्भात जी मागणी आहे त्यावर सरकारने पहिली अधिसूचना जारी केलेली आहे. त्यावर सूचना-हरकती मागविल्या आहेत. त्यानुसार तिथे कार्यवाही सुरु आहे’, असे ते म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांच्याकडून आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण केले जात आहे. याचे पडसाद इतर ठिकाणी दिसून येत आहेत. जालन्यामध्ये मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा आंदोलनाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘मनोज जरांगे यांची ‘सगेसोयरे’संदर्भात जी मागणी आहे त्यावर सरकारने पहिली अधिसूचना जारी केलेली आहे. त्यावर सूचना-हरकती मागविल्या आहेत. त्यानुसार तिथे कार्यवाही चालू आहे. या अधिसूचनेमुळे ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही’.
राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत अनुकूल प्रतिक्रिया घेत पावले उचलली आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मराठा आरक्षण व कांदा प्रश्न याचा मोठा फटका बसलेला आहे. राज्यामध्ये आता विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी उपोषणाचे हत्यार उगारले आहे. ते आपल्या उपोषणावर ठाम आहेत. ‘मरायला मी घाबरत नाही’, अशी भूमिका देखील मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे.
सगेसोयऱ्यांच्या कायद्याबाबत पहिलं नोटिफिकेशन जारी
तसेच ते म्हणाले, ‘ज्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं होतं, त्या केसेस पूर्ण करण्याची कारवाई वेगात सुरू आहेत. त्यासोबत सगेसोयऱ्यांच्या कायद्याबाबत पहिलं नोटिफिकेशन जारी केलं आहे. जरांगे यांनी देखील याचा विचार करावा, आपलं उपोषण मागे घ्यावं, असेही त्यांनी सांगितले.