घरबसल्या करा पोलिसात ई-तक्रार(File Photo : Online Payments)
पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया अतिशय किचकट आहे. अनेक जण काही गंभीर प्रकार झाल्यानंतरही पोलिस ठाण्यात जाण्याचे टाळतात. मात्र, आता या तक्रारीसाठी सिटिझन पोर्टल उपलब्ध झाली असून, या सीसीटीएनएस प्रणालीअंतर्गत ई-एफआयआर दाखल केली जाऊ शकते. या तक्रारीची पोलिसांना दखल घ्यावी लागते.
शासनाने लागू केलेल्या अने नवीन कायद्यामध्ये डिजीटल प्रणालीवर सर्वाधिक भर दिला आहे. शासनाच्या सीसीटीएनएस प्रणालीअंतर्गत अनेक सुविधा नागरिकांनाही मिळत आहेत. याअंतर्गत ई-एफआयआर दाखल केला जातो. यासाठी सिटिझन पोर्टलचा वापर करता येते. या पोर्टलवर कुठूनही कोणत्याही पोलिस ठाण्यात तक्रार देण्याची सुविधा उपलब्ध आहे. एखाद्या गुन्ह्याचा तपास करताना त्याच्याशी संबंधित फोटो, व्हिडीओ काढावे, हा व्हिडिओ न्यायालयात पुरावा म्हणून दाखल करता येणार आहे. तसेच नागरिकांना ई-तक्रारीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दरम्यान, देशातील जनता डिजीटलकडे वळली आहे, ही बाब लक्षात घेऊन शासनाने ई-तक्रारीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पोलिसांत तक्रार देण्यासाठी सिटिझन पोर्टलवर आपले अकाऊंट तयार करावे लागते. लॉगिन आयडी, पासवर्ड दिल्यानंतर हे अकाऊंट तयार होते. यावरून तक्रार केल्यानंतर तो एफआयआर पोलिसांना दिसतो. ई-तक्रार ही सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्याने वेळेची बचत होण्यासह प्रक्रियेलाही गती येते.
नागरिक सुविधेबाबत अनभिज्ञ
शासनाने नव्या कायद्याद्वारे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी ई-तक्रार सेवा सुविधा उपलब्ध करून दिली असली तरी राज्याचा शेवटचा टोक असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील अनेक नागरिक या सिटिझन पोर्टलबाबत अनभिज्ञ असल्याचे चित्र आहे. या तक्रारीची सुविधा सिटिझन पोर्टल व पोलिसांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असली तरी याची कोणतीच माहिती सर्वसामान्यांना नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे जिल्हा पोलिस दलाने या ई-तक्रार सुविधेबाबत विशेष जनजागृती करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.
तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सोपी
तक्रार दाखल झाल्यानंतर तपास अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार संबंधित ठाण्यात उपस्थित राहावे लागते. या तक्रारीची पोलिसांकडून खात्री केली जाते. यासाठी तक्रारदाराने परिपूर्ण माहिती भरूनच तक्रार करणे अपेक्षित आहे.