हिंगोली भूकंपाने हादरलं ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
हिंगोली : सध्या अनेक ठिकाणी भूकंप होत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच हिंगोलीच्या वसमत तालुक्यात यापूर्वी भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यानंतर बुधवारी (दि.10) पुन्हा एकदा भूकंप झाला. हिंगोलीतील औंढा तालुका भूकंपाने हादरला आहे. या भूकंपाने गावातील लोकांची एकच पळापळ झाली. या घटनेने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
गेल्या आठ दिवसांपूर्वीच हिंगोलीच्या वसमत तालुक्यात भूकंप झाला होता. वसमत तालुक्याच्या पांगरा शिंदे आणि परिसराला भूकंपाचे धक्के जाणवले होते. हा भूकंप 3 डिसेंबरला झाल्याचे समोर आले होते. रात्री १० वाजून ४९ मिनिटांनी वसमत तालुक्यातील कुपटी येथे भूगर्भातून मोठा आवाज येत जमिनीला मोठा धक्का बसला. या अनपेक्षित घटनेमुळे नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली होती. भूकंपावेळी या भागात भूगर्भातून अचानक मोठा आवाज आल्यानंतर जमीन हादरली होती.
त्यानंतर आता पुन्हा एकदा भूकंपाने हिंगोलीतील नागरिक भयभीत झाले आहेत. भूकंपाच्या धक्क्याने झोपलेले नागरिक घराच्या बाहेर येऊन थांबले होते. भूकंपाच्या या धक्क्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरलं. मात्र, प्रशासनाने नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केलं.
हेदेखील वाचा : ‘हिमालयाचे अस्तित्व अन् भारताचा विनाश’, ‘हे’ एकच कारण ठरणार प्रचंड विध्वंसक; BISच्या भूकंप नकाशामुळे 75% लोकसंख्या धोक्यात
दरम्यान, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन हिंगोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने करण्यात आलं. तर हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी देखील भूकंपाचे धक्के जाणवलेल्या गावातील नागरिकांची स्थानिक महसूल प्रशासनामार्फत माहिती घेण्यास सुरुवात केली आहे.
अनेक ठिकाणी भूकंपाचे हादरे
यापूर्वी हिंगोलीत झालेला भूकंप केवळ कुपटीपुरता मर्यादित नव्हता, तर पांगरा शिंदे, वापटी, शिरळी यासह आजूबाजूच्या गावांनाही भूकंपाचा हा हादरा जाणवला. मागील काही वर्षांपासून या भागात वारंवार भूकंपाचे धक्के आणि भूगर्भातून गूढ आवाज येत असल्याच्या घटना घडत आहेत. प्रशासनाकडून भूगर्भातील सूक्ष्म हालचालींमुळे हे आवाज येत असल्याचे स्पष्टीकरण दिले जात आहे. मात्र, सातत्याने होत असलेल्या या भूकंपामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
हेदेखील वाचा : Japan Earthquakes: जपान हादरला! ७.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप; १० फुटांपर्यंतच्या त्सुनामी लाटांचा इशारा!






