
Eknath Shinde
चितळी – प्रवीण दरंदले पाटील : योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराजांच्या तपश्चर्येने आणि पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र धनगरवाडीच्या भूमीवर साक्षात भगवंताचा वास असून, याच भक्तिभावातून येथे १७९ वर्षांची अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा आजही अविरत सुरू असल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. आठ ते दहा हजार टाळकऱ्यांच्या तालात १६८ तास अखंड सुरू असलेला हरिनामाचा गजर हा अलौकिक सोहळा असून, या सप्ताहाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली असली तरी विठ्ठलाच्या भक्तीपुढे कुठलाही जागतिक विक्रम खुजा असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
योगीराज गंगागिरी महाराज यांच्या १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते.उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “अतिशय अलौकिक असा अखंड हरिनाम सप्ताह होत आहे. योगीराज गंगागिरीजी महाराजांच्या तपश्चर्येने आणि पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीला मी नतमस्तक होतो.ज्यांच्या अमृतवाणीतून भक्तीचा अखंड प्रवाह वाढतो, त्या स्वामी रामगिरीजी महाराजांनाही मी मनापासून वंदन करतो. खरं म्हणजे या भूमीवर साक्षात भगवंताचा वास आहे, देवाचा आशीर्वाद आहे. म्हणून आज या ठिकाणी भक्तीचा महासागर लोटलेला आपण पाहत आहोत.”
“गंगागिरीजी महाराजांनी वारकरी संप्रदायात १७९ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा आजही सुरू आहे. येथील अखंड नामस्मरणामुळे संपूर्ण वातावरणामध्ये भक्तिभाव, प्रसन्नता आणि मांगल्य पाहायला मिळत आहे. या आनंदाच्या सोहळ्यात सहभागी होण्याचे भाग्य आपल्याला लाभले असून आपण सर्व भाग्यवान आहोत. हा भाग्याचा आणि आनंदाचा दिवस आहे,”असेही त्यांनी सांगितले.
‘रामगिरी महाराजांना धमकी देणाऱ्यांना नेस्तनाबूत करू,’ मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा
संतांनी सांगितले आहे की विठुरायाला नमन करणाऱ्या भक्तामध्ये साक्षात विठ्ठलाचा अंश येतो. त्यामुळे सप्ताहात सहभागी झालेले सर्व भाविक आमच्यासाठी विठ्ठलस्वरूप आहेत. भाविकांची ऊर्जा आणि भक्तीचा उत्साह पाहिल्यानंतर सप्ताहाच्या माध्यमातून आगळेवेगळे चित्र पाहायला मिळत असल्याचे शिंदे म्हणाले. गावाची एकी आणि देवाची कृपा या दोन्हींचा संगम या पंचक्रोशीत पाहायला मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्र ही संतांची आणि महंतांची भूमी आहे. हे सरकारही संतांच्या आशीर्वादाने आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आले आहे. त्यामुळे संतांच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत कोणी करू शकणार नाही,” असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सरकार चांगले काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
लाडकी बहीण योजना कधीही बंद पडणार नाही, असा विश्वास व्यक्त करत शिंदे म्हणाले की, “लाडक्या बहिणींनी आम्हाला राखी बांधली असून त्यांच्या विविध उपक्रमांनाही मान्यता देण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकरी सन्मान योजना सुरू केली असून महायुती सरकारने नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली आहे.आमच्या सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार कोणाचा असेल तर आमच्या बळीराजाचा आहे,” असे ते म्हणाले. कालच शेतकऱ्यांच्या खात्यावर हप्ता जमा करण्यात आला असून सहा लाख शेतकऱ्यांना पाच हजार कोटी रुपये देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
सात दिवस विठ्ठलनामाचा अखंड गजर, पहाटेची काकड आरती, भगवद्गीता आणि संतांच्या वाङ्मयावर मांडले जाणारे ओजस्वी विचार, तसेच संध्याकाळी व रात्री होणारे श्रवणीय हरिपाठ आणि कीर्तन यामधून संतविचारांचे प्रबोधन होत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. “या सप्ताहातून मोठा पुण्यसंचय होत आहे. संतांच्या विचारांचे प्रबोधन होत आहे. म्हणूनच या ठिकाणची मातीदेखील पवित्र झालेली आहे,” असे ते म्हणाले.
या ठिकाणी आठ ते दहा हजार टाळकरी एका तालात १६८ तास भजन करतात. हा ऐतिहासिक सोहळा पाहण्याचे भाग्य आम्हाला लाभले आहे. “या सप्ताहाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. मात्र विठ्ठलाच्या भक्तीपुढे कुठलाही जागतिक विक्रम खुजा आहे. या सप्ताहाची नोंद गिनीज बुकात घेतल्यामुळे उलट गिनीज बुकाचेच वजन वाढले आहे,” असे शिंदे यांनी सांगताच उपस्थित भाविकांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला.
गंगागिरी महाराजांनी दिलेला जीवनाचा मूलमंत्र सांगताना ते म्हणाले, “लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लीनता, डुबने को अभिमान.” घेण्यासाठी केवळ ईश्वराचे नाव, देण्यासाठी अन्नदान आणि या जगात तरून जायचे असेल तर नम्रता हवी. अहंकारामुळे माणूस बुडतो, असा महान विचार गंगागिरी महाराजांनी दिला असल्याचे त्यांनी नमूद केले.
“श्रीक्षेत्र धनगरवाडीमध्ये साक्षात पंढरपूर-पंढरी अवतरली आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही,” असे सांगत संतांकडून मिळालेले प्रबोधन आणि आशीर्वाद घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाण्याचे आवाहन त्यांनी केले. येथे कोणी श्रीमंत नाही, कोणी गरीब नाही आणि कोण कोणत्या जातीचा आहे हे कोणी पाहत नाही. सर्व जातीभेद विसरून एकत्र येण्याचा संदेश अखंड हरिनाम सप्ताह देत असल्याचे ते म्हणाले.यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महंत रामगिरी महाराजांचे विशेष आभार मानले.आम्ही आपल्या सोबत आहोत. आपल्या आशीर्वादाने आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना बळ आणि प्रेरणा मिळत आहे,” असे सांगत महायुती सरकार हे गोरगरीब, लाडक्या बहिणी, वारकरी, शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे सरकार असून सरकार सर्वसामान्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.