Photo Credit- Social Media Maharashtra Politics : छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेताच अंजली दमानिया आक्रमक
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी अखेर मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राज्यामध्ये दुसऱ्यांदा सरकार स्थापन झाल्यानंतर छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाले नव्हते. मंत्रिमंडळामध्ये संधी न मिळाल्यामुळे छगन भुजबळ हे नाराज होते. मात्र, अखेर त्यांना मंत्रिपद देण्यात आले आहे. राजभवनामध्ये छगन भुजबळ यांचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. याचवरून आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आक्रमक झाल्या आहेत.
छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळताच अंजली दमानिया यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, ‘राजकारणात यांना काय नाईलाज आहे, यांना ज्यामुळे चांगली माणसे मिळत नाही. एक भ्रष्टाचारी मंत्री गेल्यानंतर परत दुसरा भ्रष्टाचारी मंत्री आणण्याची काय गरज आहे हे आम्हाला कळत नाही. अशा भ्रष्टाचारी लोकांना आणून लोकांच्या डोक्यावर थोपवलं जातंय. याच्यातून आमच्यासारख्या लोकांना एक संदेश आहे, ‘तुम्ही लढून काहीच फरक पडणार नाही’.
हेदेखील वाचा : मंत्री छगन भुजबळ यांचा राजभवनामध्ये शपथविधी सोहळा पार; म्हणाले, “ज्याचा शेवट गोड ते सर्वच…”
दरम्यान, छगन भुजबळ, एकनाथ खडसे, धनंजय मुंडे या सर्वांविरुद्ध जसे मी लढले, यामुळे याच्यातून आम्हाला हे संदेश देत असेल तुम्ही लढून काहीच फरक पडणार नाही. तुम्ही लढा, काही करा, आम्हाला काही फरक पडणार नाही. आम्हाला जे करायचे ते आम्ही करत राहणार, हा संदेश त्यांच्याकडून आम्हाला देताना दिसत आहे. त्यामुळे मी संध्याकाळपर्यंत ठरवणार आहे की, महाराष्ट्राच्या भ्रष्टाचारविरोधात लढायचे की नाही, असेही दमानिया यांनी म्हटले आहे.
ज्याचा शेवट गोड ते सर्वच गोड
छगन भुजबळ यांनी शपथविधी सोहळा झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भुजबळ यांनी आनंद आणि समाधान व्यक्त केले आहे. भुजबळ म्हणाले की, ‘ज्याचा शेवट गोड ते सर्वच गोड आहे, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी त्यांच्या मंत्रिपदाबाबत दिली आहे. त्याचबरोबर माध्यमांकडून भुजबळ यांना खात्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. याबाबत मंत्री भुजबळ म्हणाले की, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे खाते देतील ते मान्य असेल’.