छगन भुजबळ मंत्रिपदावर मनोज जरांगे पाटील नाराजी व्यक्त केली आहे (फोटो - सोशल मीडिया)
जालना : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांची राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये एन्ट्री झाली आहे. महायुतीचे राज्यामध्ये पुन्हा एकदा सरकार स्थापन झाल्यानंतर भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये संधी नाकारली होती. यामुळे छगन भुजबळ यांनी पक्षाच्या नेतृत्वावर उघ़डपणे नाराजी व्यक्त केली होती. यानंतर आता भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये संधी देण्यात आली असून यामुळे नाशिकमधील त्यांच्या समर्थकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. तर दुसरीकडे मात्र नाराजीचा सूर पसरला आहे.
मंत्री छगन भुजबळ यांना ओबीसी नेते म्हणून देखील ओळखले जाते. जालनामधील मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठे राज्यव्यापी आंदोलन उभे केले होते. ओबीसी अंतर्गत मराठा आरक्षण देण्याची जरांगे पाटील यांची मूळ मागणी होती. याविरोधात छगन भुजबळ यांनी कठोर भूमिका घेत यासाठी तीव्र विरोध दर्शवला होता. यामुळे ओबीसी नेते छगन भुजबळ आणि मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये अनेकदा वाकयुद्ध देखील झाले. आता छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या आता निवडणूका आहेत. त्यामुळे तात्पुरता आनंद मिळावा म्हणून दिला असेल. त्याची चार पाच माकडं नाराज होती. त्यामुळे आता थोडाफार गुलाल उधळतील, दोन चार फुसके फटाके वाजवतील आणि ढोल लावून दोन चार उड्या मारतील. जिल्हा परिषदेला तेवढंच इवळायचं नाही म्हणून दिलं असेल, असा टोला मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी लगावला आहे,
पुढे ते म्हणाले की, “तो किती काही असला तरी आम्हाला काही फरक पडत नाही. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्याला मंत्रिपद दिलं जात आहे. अजित पवार हे जातीयवादी लोक पोसण्याचं काम करत आहेत. अजित पवार ही मोठी चूक करत आहेत. याच्या परिणामाला त्यांना सामोरे जावे लागले,” असा गंभीर इशारा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर एका बाजूला आनंद तर दुसऱ्या बाजूला नाराजीचा सूर पसरला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मंत्रिपद मिळाल्यानंतर छगन भुजबळ यांनी आनंद आणि समाधान व्यक्त केले आहे. भुजबळ म्हणाले की, ज्याच्या शेवट गोड ते सर्वच गोड आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे खाते देतील ते मान्य असेल. 1991 पासून मी शपथ घेतो आहे. मंत्रिपद येत आहे आणि जात आहे. अनेक खाती सांभाळली आहे. यापुढे देखील जे खाते मिळेल ते सांभाळेल, असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. त्याचबरोबर भुजबळ यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती. यावर भुजबळ यांनी त्यांना धन्यवाद सांगा असे हसून म्हणत भुजबळ यांनी टोला लगावला आहे.