Electric Shock (Photo Credit- Social Media)
गोंदिया : शेतात रबी हंगामातील धान पिकाला सिंचन करण्यासाठी मोटार सुरू करत असताना करंट लागून शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.29) कटंगी सिंचन प्रकल्पाच्या खाली असलेल्या शेतात घडली. बालचंद बाबुलाल हरीणखेडे (वय 57) असे शेतकऱ्याचे नाव आहे.
सध्या उन्हाळ्याच्या छळा बसू लागल्या आहेत. दिवसभर उन्ह तपत आहे. अशात शेतातील पाणी लवकरच आटत आहे. त्यातच वीजपुरवठा देखील शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे होत नसून वारंवार पुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्यामुळे लाईट आली की, शेतकरी मोटार सुरू करण्यासाठी शेतात धाव घेतात. गोरेगाव तालुक्यातील कटंगी येथील बालचंद बाबुलाल या शेतकऱ्याची शेती कटंगी सिंचन प्रकल्पाच्या खालच्या बाजूला आहे. तो शेतकरी मंगळवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास शेतात मोटारपंप चालू करण्याकरिता गेला होता. मोटार चालू करत असताना जीवंत वीज तारांचा स्पर्श झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
परिसरात असलेल्या शेतकऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी तातडीने वीजपुरवठा खंडित केला. परंतु, तोपर्यंत बालचंद हरीणखेडे या शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. गोरेगाव पोलिसांनी घटनेची नोंद केली असून, पुढील तपास पोलिस हवालदार कोसमे करत आहेत.
सातपूरच्या श्रमिकनगर येथेही दुर्घटना
श्रमिकनगर येथे विजेचा शॉक लागू दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. मंगेश राणे (वय 20, रा. सात माऊली चौक, श्रमिकनगर) हा आपल्या नवनिर्माण बांधकामाच्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेला होता. सकाळी पावणे बाराच्या सुमारास वरच्या मजल्यावर तो उभा असताना घराजवळून गेलेल्या उच्च 11 केव्ही क्षमतेच्या तारेचा शॉक लागून त्याचा मृत्यू झाला.