बारामती : ज्येष्ठ नेते शरद पवार अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठान मध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘नमो महारोजगार’ मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये सुरुवातीला प्रशासनाने शरद पवार यांचे नाव टाकले नसल्याने उलट-सुलट चर्चांना उधाण आले असतानाच शुक्रवारी प्रशासनाने नव्याने प्रसिद्ध केलेल्या निमंत्रण पत्रिकेमध्ये प्रमुख उपस्थितीमध्ये शरद पवार यांचे नाव टाकले आहे.
शरद पवार यांचे नाव नसल्याने उलट-सुलट चर्चा
शनिवार दिनांक २ मार्च २०२४ रोजी बारामती येथील विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संकुलामध्ये नमो महा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, या मेळाव्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये विद्या प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष असलेले शरद पवार यांचे नाव नसल्याने उलट-सुलट चर्चा सर्वत्र सुरू होत्या.
शरद पवार यांच्याकडून स्नेहभोजनाचे निमंत्रण
शरद पवार यांनी गेले काही दिवसांपूर्वी पुणे शहर व जिल्ह्यातील शासकीय कार्यक्रमांमध्ये आपले नाव टाकू नये, अशा सूचना राज्य शिष्टाचार विभाग व जिल्हा प्रशासनाला दिल्या असल्याचे शासकीय सूत्रांनी सांगितले होते. गुरुवारी शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांना कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या गोविंद बाग या निवासस्थानी स्नेहभोजनाचे निमंत्रण दिले होते.
शरद पवार यांच्या या पत्राची जोरदार चर्चा
आपण स्वतः अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संकुलात ‘नमो महाराज मेळाव्या’च्या निमित्ताने आपण येत असल्याने संसद सदस्य या नात्याने मी आपले स्वागत करू इच्छितो, या पत्रात शरद पवार यांनी म्हटले होते. शरद पवार यांच्या या पत्राची चर्चा माध्यमांमध्ये चांगलीच रंगली होती. भोजनाचे निमंत्रण पत्राद्वारे देऊन शरद पवार यांची नक्की राजकीय खेळी काय? चा सवाल उपस्थित केला जात होता. यातच प्रशासनाने ‘नमो महारोजगार मेळाव्या’ची पत्रिका शुक्रवारी काढली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव सर्वात वर
या निमंत्रण पत्रिकेमध्ये राज शिष्टाचारानुसार सर्वात वरती उद्घाटक म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव, तर त्यांच्या नावाखाली प्रमुख उपस्थिती म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची नावे व त्याखाली माजी मुख्यमंत्री व माजी संसद सदस्य म्हणून शरद पवार यांचे नाव तर सन्माननीय उपस्थितीमध्ये सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योजकता विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे सन्माननीय उपस्थितीमध्ये खासदार सुप्रिया सुळे, खा. वंदना चव्हाण, यांच्या हस्ते खा. डॉ. अमोल कोल्हे, खा. श्रीरंग बारणे तुमच्यासह पुणे शहर व जिल्ह्यातील सर्व पक्षीय विधान परिषद व विधानसभा सदस्यांची नावे आहेत.