ओव्हरलोड ट्रकची चार वाहनांना जोरदार धडक; टोलनाका चुकवण्याच्या प्रयत्नात घडलं सारं काही... (संग्रहित फोटो)
जेजुरी : भाऊ-बहिणीच्या अतूट नात्यचा सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधनासाठी बहिणीकडे जाऊन परतत असताना झालेल्या दुचाकी अपघातात अंबाजीचीवाडी (ता. पुरंदर) येथील गणेश बाळासो पवार (वय २४) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शनिवार (दि.९) रोजी रात्री साडेनऊ च्या दरम्यान जुनी जेजुरी– कोळविहिरे मार्गावरील परिसरात हा अपघात घडला आहे.
गणेश पवार हा शनिवार (दि.९) सकाळी अंबाजीचीवाडी येथून बारामतीमधील आपल्या आत्याबहिणीकडे रक्षाबंधनासाठी गेला होता. बहिणीने भावाला राखी बांधून त्याला दीर्घायुष्य लाभावे, यासाठी मनोकामना केली. बहिणीने राखी बांधली, औक्षणही केले त्यांच्या गप्पाही रंगल्या. गप्पा मारून झाल्यावर रात्री तो दुचाकीवरून घरी परतत होता. परंतु मोरगावमार्गे येत असताना जुना जेजुरी – कोळविहिरे रस्त्यावर असलेल्या खराब रस्त्याच्या अवस्थेमुळे अचानक आलेल्या स्पीड ब्रेकरवर त्याची दुचाकी घसरली. यामुळे तो रस्त्यावर आदळला आणि डोक्याला गंभीर मार लागून तो रक्ताच्या थारोळ्यात पडला.
अपघातानंतर घटनास्थळी जमा झालेल्या नागरिकांनी त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र उपचार सुरू होण्याआधीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. भाऊ-बहिणीच्या अतुट नात्याच्या सणादिवशीच एका भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला. गणेश पवार हा अत्यंत शांत स्वभावाचा आणि जबाबदार तरुण म्हणून ओळखला जात होता. तो आपल्या कुटुंबाचा आधारस्तंभ
होता. त्याच्या पश्चात आई-वडील, दोन आत्या आणि आजी असा परिवार असून त्याच्या अचानक जाण्याने संपूर्ण पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावातही हळहळ व्यक्त केली जात आहे. गणेशचा मृत्यू रस्त्याच्या खराब स्थितीमुळे झाल्याचे बोलले जात आहे.
हे सुद्धा वाचा : वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती; विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल
स्थानिक नागरिकांनी संबंधित प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आज एक तरुण जीव गमावून बसला आहे. यामुळे संतप्त नागरिकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत जेजुरी पोलिस ठाण्यामध्ये संबंधित विभागाच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची तक्रार दाखल केली असल्याचे सत्यवान सुर्येवंशी व संजय पवार यांनी नवराष्ट्रशी बोलताना सांगितले. दरम्यान गावातील होतकरु युवक अपघातामध्ये मृत्यू पावल्याने अंबाजीचीवाडी ग्रामस्थांनी गावातील सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द केले. रविवार (दि.१०) सकाळी गावकरी, मित्र आणि नातेवाईक यांच्या उपस्थितीत गणेशवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.