
सोमेश्वरनगर येथे संत सोपानकाका पालखीचे पहिले गोल अश्वरिंगण उत्साहात संपन्न
सकाळी सात वाजण्याच्या सुमारास सोहळा निंबूत येथून पुढे मार्गस्थ झाला. निंबूत येथील मुक्काम सकाळी उरकून सोहळा न्याहरीसाठी निंबूत छपरी येथे विसावला. याठिकाणी सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे, संचालक लक्ष्मण गोफणे, उपसरपंच अमर काकडे, गौतम काकडे यांच्यासह ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले. दुपारच्या विसाव्यासाठी पालखी सोहळा वाघळवाडी येथे विसावला. यावेळी सरपंच ॲड हेमंत गायकवाड, उपसरपंच जितेंद्र सकुंडे, माजी सरपंच सतीश सकुंडे, विजयराव सावंत, अविनाश सावंत, अजिंक्य सावंत, तुषार सकुंडे, विशाल हंगीरे, गणेश जाधव, सुचिता साळवे, ग्रामविकास अधिकारी मनोज डेरे उपस्थित होते. दुपारी तीन वाजता पालखी सोहळा अश्व रिंगणासाठी मु. सा. काकडे महाविद्यालयात दाखल झाला. यावेळी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, संचालक राजवर्धन शिंदे, काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. यावेळी सोमेश्वरचे उपाध्यक्ष किसन तांबे, संचालक ऋषिकेश गायकवाड, लक्ष्मण गोफणे, मिलिंद कांबळे, प्रमोद काकडे, रमाकांत गायकवाड, दिग्विजय जगताप, विक्रम भोसले, प्रा. जगन्नाथ साळवे, नीता फरांदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी वारकऱ्यांनी ‘ज्ञानोबा तुकाराम’चा एकच गजर केला. पहिले अश्वरिंगण पाहण्यासाठी लाखो वारकऱ्यांनी गर्दी केली होती. भक्तिमय वातावरणात विठुनामाचा गजर करत सोहळ्यातील पहिले रिंगण काकडे महाविद्यालयाच्या प्रांगणात उत्साहात पार पडले. काकडे महाविद्यालयाच्या प्रांगणात पालखी विसावल्यानंतर प्रथम सोपानकाकांच्या पादुकांचे रिंगण पूर्ण झाले. त्यानंतर मानाच्या अश्वाने दोनवेळा रिंगण पूर्ण करीत उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. गोल रिंगण पूर्ण होताच विणेकरी तसेच वृंदावन डोक्यावर घेऊन महिलांनी गोल रिंगण पूर्ण केले. महसूल विभाग, सोमेश्वर कारखाना प्रशासन, वाघळवाडी ग्रामपंचायत, आरोग्य विभाग यांनी पालखी सोहळ्याला सहकार्य केले. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते व पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सायंकाळी सहा वाजता पालखी सोहळा मुक्कामासाठी सोमेश्वर कारखान्याच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रांगणात विसावला.
यावर्षी शासनाकडून उत्तम प्रकारे वारकऱ्यांची सोय करण्यात आली असून पाणी, शौचालय, वैद्यकीय सेवा पुरविल्या आहेत. दररोज प्रशासनाकडून आढावा घेत माहिती घेतली जात आहे. तसेच यावर्षीच्या सोहळ्यात १२६ दिंड्या असून, सोहळ्याच्या पुढे २७ तर सोहळ्याच्या मागे ९९ दिंड्या आहेत. या वर्षी वारकऱ्यांची संख्या वाढली आहे. सुमारे दीड लाख वारकरी या सोहळ्यात सहभागी झाले आहेत.