Photo Credit- Social Media गुजरातचे माजी मुख्यमंत्री जाहीर करणार महाराष्ट्राचा 'मुख्य'मंत्री
निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन 10 दिवस उलटल्यानंतरही महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही कायम आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चा आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी जवळपास निश्चित झाले आहे. त्यातच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहराही अद्याप गुलदस्त्यात आहेत. त्यामुळे राज्याचा मुख्यमंत्री पदाची उत्सुकताही वाढली आहे. महाराष्ट्रातील सरकारस्थापनचा वाढता तिढा पाहता केंद्रीय नेतृत्त्वाने काल (2 डिसेंबर) गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली.
मात्र राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) वतीने निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलेले विजय रुपाणी यांनी मोठी घोषणा केली आहे. उद्या म्हणजेच बुधवारी विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड केली जाईल आणि त्याबाबत भाजप हायकमांडला कळवले जाईल, असे त्यांनी सांगितले आहे. विधिमंडळ पक्षनेतेपदाच्या निवडीमुळे मुख्यमंत्री कोण होणार, याचे चित्र स्पष्ट होणार आहे.
महाराष्ट्रात 5 डिसेंबरला नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. उद्या होणाऱ्या भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यापूर्वी उदया (4 डिसेंबर) रोजी सकाळी 11 वाजता भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या नावाला मंजुरी देण्यात येईल. या बैठकीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
विजय रुपाणी म्हणाले, ‘मी आज संध्याकाळी मुंबईला जाणार आहे. निर्मला सीतारामनही मुंबईत दाखल होतील. महाराष्ट्र भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होईल. तिथे आपण चर्चा करून विधीमंडळ पक्ष नेत्याची निवड एकमताने केली जाईल. हायकमांडला मुख्यमंत्रीपदाच्या नावाची माहिती दिली जाईल. त्यानंतरच त्याची अधिकृतपणे घोषणा केली जाईल. आमच्या हायकमांडने तिन्ही मित्रपक्षांशी चर्चा केली असून त्यांना कोणतीही अडचण नाही. सर्व काही सुरळीतपणे आणि एकमताने होईल.
त्याचवेळी शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाजपवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, ‘एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे कार्यवाह मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री गायब कसा होऊ शकतो? महाराष्ट्रात हा खेळ सुरू आहे. 10 दिवस झाले. त्यांच्याकडे (महायुती) प्रचंड बहुमत आहे, पण त्यानंतरही त्यांना मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर करता आलेले नाही. आतापर्यंत राजभवनावर सरकार स्थापनेचा दावा करण्यात आलेला नाही. हा सगळा दिल्लीचा खेळ आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या दुष्ट लीला दिल्लीतून चालवल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
चहा-कॉफीचे व्यसन होईल आरोग्याचे ‘जानी दुश्मन’, वेदनादायक मृत्यूची टांगती तलवार!
दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार दिल्लीत आहेत. ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्याची शक्यता असून, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले भाजप नेते गिरीश महाजन यांनी काल ठाण्यात एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी महायुतीत असलेल्या मतभेदाचे वृत्तही फेटाळून लावले.
दुसरीकडे, 5 डिसेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याच्या तयारीत भाजप व्यस्त आहे. महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही शपथविधीच्या तयारीचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला 40 हजारांहून अधिक लोक उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या शपथविधीला पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि अनेक केंद्रीय मंत्री आणि राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.






