नेरूळ पोलिसांची रेसिंगबाजांवर कारवाई (फोटो- टीम नवराष्ट्र)
नेरूळ पोलिसांची रेसिंगबाजांवर कारवाई
जीवितास धोका निर्माण करणाऱ्या तिघा बाईकर्सवर गुन्हा
बेकायदेशीर रेसिंगमुळे नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका
सावन वैश्य/नवी मुंबई: पाम बीच रोडवर रात्रीच्या वेळी मोटारसायकलींच्या धोकादायक रेसिंग प्रकारांवर नेरूळ पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. बेदरकार वेगात रेसिंग करत नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या तिघा बाईकर्सवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. ११ नोव्हेंबर रोजी रात्री नेरूळ पोलिसांनी पाम बीच रोडवर गस्त वाढवली असता तीन युवक उच्च वेगात रेसिंग करताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना थांबवून चौकशी केली असता रेसिंगचे पुरावे मिळाल्याने तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे
१) प्रणव जाधव (२७), नेहरू नगर, मुंबई
वाहन : BMW 9000 CC (MH 02-GN-0678)
२) सूर्यदेवसिंह देसाई (२७), चेंबूर, मुंबई वाहन : Honda 650 CC (MH 15-JE-1714)
३) अभिषेक साबळे (२७), पनवेल, रायगड वाहन : हिरो 200 CC (MH 03-ET-7752)
या तिन्ही वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
नेरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नायकोडी यांनी सांगितले की, पाम बीच रोडवरील बेकायदेशीर रेसिंगमुळे नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होतो. अशा प्रकारच्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी पुढील काळात अधिक कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.






