DYSP Anjana Krushna News: DYSP अंजना कृष्णा यांच्या समर्थनार्थ गांधीगिरी आंदोलन; सोलापुरात नेमंक काय चाललयं?
Solapur News: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी फोनवरील संभाषणानंतर चर्चेत आलेल्या करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक (डीवायएसपी) अंजना कृष्णा यांच्या समर्थनार्थ अनोखे आंदोलन करण्यात आले. करमाळ्याचे आराध्य दैवत आई कमलाभवानी यांच्या प्रतिमेसमोर अंजना कृष्णा यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करून नागरिकांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली. जनशक्ती शेतकरी संघटनेनं गांधीगिरी पद्धतीने हे आंदोलन केले. या संघटनेचे अध्यक्ष अतुल खूपसे पाटील व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अंजना कृष्णा यांच्या मनोधैर्याला बळ देण्यासाठी हा दुग्धाभिषेक सोहळा पार पडला.
करमाळा तालुक्यात आयपीएस अंजना कृष्णा यांच्या समर्थनार्थ शेतकरी रस्त्यावर उतरू लागले आहेत. शेतकरी नेते अतुल खूपसे यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सोलापूर पोलिसांनी 15 ते 20 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. आई कमलाभवानी मंदिरासमोर अंजना कृष्णा यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करून त्यांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला. “लाडक्या बहिणीचा अपमान महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही,” अशी ठाम भूमिका अतुल खूपसे यांनी मांडली. दरम्यान, करमाळा येथील शेतकऱ्यांनी लावलेल्या बॅनरवर “महाराष्ट्र हा शिवरायांचा आहे, इथे स्त्रीला इज्जत दिली जाते” असा आशय लिहून आपला निषेध नोंदवला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रशासनावर वचक ठेवणारे लोकप्रतिनिधी अशी ख्याती आहे. मात्र, सोलापूरमधील पोलिस उपअधीक्षकांशी बोलताना त्यांनी दमदाटी केल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्टीकरण देण्यात आलं. विरोधक खोडसाळपणे हा प्रचार करत आहेत. प्रत्यक्षात, अजित पवार यांनी शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेत त्यांच्या तक्रारींवर कारवाई करण्याचे पोलिसांना निर्देश दिले होते. मात्र, त्याला दमदाटीचा रंग देऊन खोटा प्रचार केला जात असल्याचं राष्ट्रवादीने म्हटलं आहे.
Jalgaon Crime: जळगावात 6 वर्षांच्या चिमुकल्याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत शेजाऱ्याच्या घरात सापडला
सोलापूर जिल्ह्यातील बेकायदेशीर माती उत्खननाविरुद्ध करमाळा उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा यांनी कारवाई केल्यानंतर वाद निर्माण झाला. या कारवाईमुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते बाबा जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधून अधिकाऱ्याशी बोलण्याची मागणी केली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अजित पवार अधिकाऱ्याला फटकारताना आणि ही कारवाई थांबवण्याचा आदेश देत असल्याचे ऐकू येते. तसेच, “मी तुम्हाला ते थांबवण्याचा आदेश देतो” आणि “मी तुमच्यावर कारवाई करेन,” असे वक्तव्य करतानाही ते दिसून येतात.
व्हिडिओ समोर आल्यानंतर अजित पवारांवर विरोधकांनी जोरदार टीका केली. त्यांनी पवार यांच्यावर प्रशासकीय कामकाजात अयोग्य हस्तक्षेप केल्याचा आरोप केला. वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी शुक्रवारी स्पष्टीकरण दिले. माझा हेतू बेकायदेशीर कारवायांना पाठबळ देण्याचा नव्हता, तर त्या वेळी निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती कमी करण्याचा होता. कायदाविरोधी आदेश देण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता. असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.