आशिया कप ट्रॉफी(फोटो-सोशल मीडिया)
Asia Cup 2025: आशियाई क्रिकेटचा सर्वात मोठा महासंग्राम, आशिया कप 2025, लवकरच सुरू होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व 8 संघांनी आपापल्या संघांची घोषणा केली आहे. वनडे आणि टी-20 दोन्ही फॉरमॅटचा विचार करता, ही आशिया कपची 17वी आवृत्ती असणार आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, या स्पर्धेची सुरुवात तब्बल ४१ वर्षांपूर्वी झाली होती आणि पहिल्याच आवृत्तीत भारताने बाजी मारली होती?
आशिया कपची पहिली आवृत्ती 1984 साली खेळली गेली होती. त्यावेळी या स्पर्धेत केवळ भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका या तीन संघांचा सहभाग होता. ही स्पर्धा ‘राउंड रॉबिन’ पद्धतीने खेळली गेली, ज्यात प्रत्येक संघाने दोन-दोन सामने खेळले. एकूण तीन सामन्यांनंतर गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या संघाला विजेता घोषित करण्यात आले, त्यावेळी अंतिम सामना (फायनल) खेळवला गेला नव्हता.
1984 च्या एशिया कपमधील पहिला सामना श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात झाला, ज्यात श्रीलंकेने विजय मिळवला. त्यानंतर, सुनील गावस्कर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिला सामना श्रीलंकेविरुद्ध 10 विकेट्सने जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला 54 धावांनी नमवून भारताने दोन्ही सामन्यांत विजय मिळवला. गुणतालिकेत भारत 8 गुणांसह अव्वल स्थानी राहिल्याने त्याला विजेता घोषित करण्यात आले. श्रीलंकेने एक सामना जिंकल्याने त्यांचे 4 गुण होते, तर पाकिस्तानला दोन्ही सामन्यांत पराभव पत्करावा लागला होता.
अशियन क्रिकेट कौन्सिलकडे (ACC) आशिया कपच्या आयोजनाचा अधिकार आहे. यावर्षी आशिया कप 2025 चे यजमानपद भारताला मिळाले आहे, परंतु भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे हे सामने तटस्थ ठिकाणी म्हणजेच युएई (UAE) मध्ये खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, अफगाणिस्तान, युएई, ओमान आणि हाँगकाँग असे एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत.
टीम इंडिया आशिया कप 2025 मध्ये 10 सप्टेंबर रोजी यूएई विरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. त्यानंतर त्यांचा पुढचा सामना 14 सप्टेंबर रोजी पाकिस्तानशी होईल. हे दोन्ही सामने दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळले जातील. त्यानंतर भारतीय संघ 19 सप्टेंबर रोजी ओमान विरुद्ध आपला पुढचा सामना खेळेल. या आशिया कपसाठी टीम इंडियाला ग्रुप-ए मध्ये स्थान देण्यात आले आहे. दोन्ही गटातील टॉप-2 संघ सुपर-4 मध्ये स्थान मिळवतील.
आशिया कप 2025 साठी टीम इंडियाचा संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा, रिंकू सिंग