अंजना कृष्णा प्रकरण महागात पडले ; अमोल मिटकरींचा बिनशर्त माफीनामा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील फोनवरील वाद आता संपुष्टात येत असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अंजना कृष्णा यांच्या शैक्षणिक आणि जात प्रमाणपत्रांवर प्रश्न उपस्थित केले होते. इतकेच नव्हे तर, त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात यावी आणि त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे केली होती. पण आज त्यांनी त्यांचे वक्तव्य मागे घेत बिनशर्त माफी मागितली आहे. त्यामुळे या प्रकरणावर पडदा पडण्याची शक्यता आहे.
US Open 2025 : भारताच्या आशा मावळल्या! युकी भांब्री-वेन्स जोडीचा उपांत्य फेरीत पराभव..
अमोल मिटकरी यांनी त्यांच्या ट्विटर एक्सवर पोस्ट शेअर करत माफी मागितली आहे. “सोलापुर घटने संदर्भात केलेला ट्वीट मी बिनशर्थ मागे घेऊन दिलगिरी व्यक्त करतो.ही माझ्या पक्षाची भुमिका नव्हती तर माझी वैक्तिक भुमिका होती .आपले पोलिस दल व प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. मी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या भुमिकेशी पूर्णपणे सहमत आहे.”
अमोल मिटकरी यांनी अलीकडेच यूपीएससीला पत्र लिहून आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या कागदपत्रांची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यांचा दावा होता की, कोणत्याही आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यापूर्वी त्यांची सर्व प्रमाणपत्रे आणि शैक्षणिक पात्रता वैध आहेत याची खात्री करणे आवश्यक आहे. मात्र, शनिवारी मिटकरी यांनी आपले ट्विट मागे घेतले आणि स्पष्ट केले की, माझा हेतू कोणाचीही प्रतिमा दुखावण्याचा नव्हता. जर माझ्या विधानामुळे कोणाचे नुकसान झाले असेल तर मी दिलगीर आहे. असं म्हणत त्यांनी माफीही मागितली.
माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील बेकायदेशीर माती उत्खननाविरुद्ध करमाळा उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा यांनी कारवाई केल्यानंतर वाद निर्माण झाला. या कारवाईमुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते बाबा जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधून अधिकाऱ्याशी बोलण्याची मागणी केली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अजित पवार अधिकाऱ्याला फटकारताना आणि ही कारवाई थांबवण्याचा आदेश देत असल्याचे ऐकू येते. तसेच, “मी तुम्हाला ते थांबवण्याचा आदेश देतो” आणि “मी तुमच्यावर कारवाई करेन,” असे वक्तव्य करतानाही ते दिसून येतात.
आता याला काय म्हणावं राव…! तंबाखू आणि सिगारेटपेक्षा ‘बिडी’ स्वस्त, सरकारच्या कर धोरणावर प्रश्नचिन्ह
व्हिडिओ समोर आल्यानंतर अजित पवारांवर विरोधकांनी जोरदार टीका केली. त्यांनी पवार यांच्यावर प्रशासकीय कामकाजात अयोग्य हस्तक्षेप केल्याचा आरोप केला. वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी शुक्रवारी स्पष्टीकरण दिले. माझा हेतू बेकायदेशीर कारवायांना पाठबळ देण्याचा नव्हता, तर त्या वेळी निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती कमी करण्याचा होता. कायदाविरोधी आदेश देण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता. असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
अमोल मिटकरी यांच्या माफीनाम्यानंतर हा वाद हळूहळू शांत होताना दिसत आहे. अंजना कृष्णा यांच्या कठोर कार्यशैलीला जनतेचा पाठिंबा मिळाल्यामुळे जिल्हा प्रशासनावरील विश्वास वाढला आहे. यामुळेच नेत्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. सध्या अंजना कृष्णा आपली जबाबदारी पार पाडत असून, जिल्हा प्रशासन बेकायदेशीर खाणकामाविरुद्ध अधिक कठोर कारवाई करत आहे.