वसई । रवींद्र माने : सिनेमात काम देण्याच्या आमिषाने तरुणींचे अश्लिल चित्रण करणारी बनावट प्रोडक्शन हाऊसची टोळी वसईत सक्रीय झाली असून, एका १८ वर्षीय तरुणीचे अश्लील चित्रण करून ते वेबसिरीजमध्ये प्रसारीत करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे.
१८ वर्षीय तरुणी अभिनेत्री बनण्यासाठी मुंबईत आली होती, मुंबई परवडत नसल्यामुळे ती वसईत एका घरात भाडेकरु म्हणून रहात होती. चित्रपट आणि बेवसिरीजमध्ये काम मिळविण्यासाठी ती विविध प्रॉडक्शन हाऊस ना भेटून आली होती. अखेर १ नोव्हेंबरला तिला एका कंपनीतून काॅल आला, आम्ही नवीन बेवसिरीज तयार करत असून ऑडीशन देण्यासाठी यावे लागेल असे तिला सांगण्यात आले. त्यामुळे काम मिळण्याच्या आशेने ती दुसऱ्या दिवशी कंपनीने बोलावलेल्या ठिकाणी विरारच्या अर्नाळा समुद्री किनाऱ्याला गेली. तिथे तिला प्रॉडक्शन कंपनीचा दिग्दर्शनक, कॅमेरामन, अभिनेता आणि महिला मेकअप आर्टीस्ट असे चौघे भेटले. त्यांनी तिला एका लॉजमध्ये ऑडीशनसाठी नेले. तिथे तिला फसवून अश्लील दृश्य देण्यास भाग पाडले. ही दूश्ये केवळ ऑडीशनचा भाग असून तिचा कुठे वापर केला जाणार नाही असे तिला त्यांनी आश्वासीत केले.
या चित्रीकरणानंतर तिला या कंपनीमधील कोणाचाही कॉल आला नाही. त्यामुळे तिने संबंधीत लोकांना काॅल केले, मात्र, त्यांचे मोबाईल बंद असल्याचे दिसून आले. दरम्यान, तिची दृश्ये विविध अश्लील संकेतस्थळावर प्रसारीत केल्या जाणाऱ्या अश्लील वेबसिरीज मध्ये दिसून आले. तशी माहिती तिला परिचितांकडून कळाली. परिणामी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तिने अर्नाळा सागरी पोलीस ठाणे गाठले. या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणूक तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनयिमाच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर हे प्रकरण गुन्हे शाखा ३ कडे वर्ग करण्यात आले. काही वर्षापूर्वी एक मोठा सेलिब्रिटी अशाच प्रकारे अभिनेत्रींची फसवणूक करुन त्यांची अश्लील चित्रफिती तयार केल्याच्या प्रकरणात गुंतल्याची मोठी चर्चा झाली होती. हा असाच प्रकार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे नवोदित तरुणींची फसवणूक करणारी टोळी प्रॉडक्शन हाऊस च्या नावाखाली कार्यरत असल्याचे उघड झाले आहे.
Web Title: Gang of fake production houses active in vasai 18 year old girls pornographic pictures and web series aired