
गोमंतकीय वारकऱ्यांसाठी मोठी बातमी! पंढरपुरात उभारणार 'गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन
दरवर्षी गोव्यातून हजारो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येतात. मात्र, त्यांच्या मुक्कामासाठी कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध नव्हती. ही अडचण लक्षात घेऊन मागील वर्षी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी गोवा भवन उभारण्याची घोषणा केली होती. आता त्या घोषणेला प्रत्यक्ष आकार मिळत असून, भवनासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. पुढील वर्षीच्या आषाढी एकादशीपूर्वी हे भवन पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हे भवन उभारल्यानंतर गोमंतकीय वारकऱ्यांना पंढरपूरमध्ये सुरक्षित, सुसज्ज आणि हक्काचे निवासस्थान उपलब्ध होणार आहे. त्यामुळे दरवर्षी वारीसाठी येणाऱ्या हजारो भाविकांची मोठी सोय होणार आहे.
याचबरोबर गोवा सरकारने वारकऱ्यांच्या प्रवासासाठीही मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील नोंदणीकृत वारकरी दिंड्यांना प्रवासासाठी आर्थिक सहाय्य देण्याची योजना सुरू करण्यात आली असून, कला आणि संस्कृती संचालनालयामार्फत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते ३६ नोंदणीकृत दिंड्यांना आर्थिक सहाय्य वितरित करण्यात आले. दिंडीतील वारकऱ्यांच्या संख्येनुसार ₹१ लाख ते ₹५ लाखांपर्यंत आर्थिक मदत दिली जाणार आहे. किमान ४० वारकरी असलेल्या नोंदणीकृत दिंड्यांना परतीच्या बसप्रवासासाठी आर्थिक सहाय्य तसेच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
या योजनेअंतर्गत सुमारे ३,५०० गोमंतकीय वारकऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. प्लास्टिकमुक्त वारीला प्रोत्साहन देण्यासाठी कापडी पिशव्या, पारंपरिक वारकरी वेशभूषा, औषधांचे संच (मेडिकल किट) तसेच वारी मार्गावरील निश्चित ठिकाणी वैद्यकीय सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि पर्यावरणपूरक होणार आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या या निर्णयामुळे गोमंतकीय वारकऱ्यांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होत असून, वारकरी संप्रदायातून या निर्णयाचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात येत आहे. पंढरपूरमध्ये उभारण्यात येणारे ‘गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन’ हे गोवा आणि पंढरपूर यांच्यातील आध्यात्मिक नात्याला अधिक बळ देणारे ठरणार असल्याची भावना वारकऱ्यांनी व्यक्त केली आहे.