
रेल्वे विभागाने याबाबत वनविभागाला माहिती दिल्यानंतर अर्जुनी-मोर येथील वनविभागाचे रेस्क्यू पथक वन अधिकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पाहणीदरम्यान बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. सदर ठिकाण महालगाव शिवारात असून, रेल्वेच्या धडकेमुळे बिबट्याचे मुंडके व धड वेगळे झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. वनपरिक्षेत्र अधिकारी आर. एम. बहुरे यांच्या उपस्थितीत घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. त्यानंतर बिबट्याचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी वनआगार, अर्जुनी-मोर येथे हलविण्यात आला.
मानक कार्यपद्धतीनुसार शवविच्छेदन शवविच्छेदनादरम्यान विविध नमुने घेण्यात आले असून, ते पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. ही संपूर्ण कार्यवाही उपवनसंरक्षक अविनाश मेग्राम व नवेंगावबांधचे वनक्षेत्र अधिकारी प्रकाश निष्कासन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी आर. एम. बहुरे करीत आहे.
महालगाव परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल व वनक्षेत्र असल्याने या भागात विविध वन्यप्राण्यांचा वावर आढळतो. जंगलातून जाणाऱ्या रेल्वे मार्गामुळे वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
घटनेनंतर महालगाव परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात वाघ किंवा त्याची मादी फिरत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे विशेषतः संध्याकाळनंतर जंगलालगतच्या भागात जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.