(फोटो सौजन्य-AI एआय)
शाळांमधील विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनासाठी शासनाकडून मिळणाऱ्या पोषण आहाराच्या तांदळाची परस्पर विक्री केल्याचा गंभीर प्रकार अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील दिनकरनगर आणि जरूघाटा येथील शाळांमध्ये समोर आला. दिनकरनगर शाळेतील चार आणि जरूघाटा शाळेतील दोन, असे एकूण सहा कट्टे तांदूळ करांडाडी व्यापाऱ्याला विकल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
दिनकरनगर शाळेत यावर्षी जिल्हा परिषदेच्यावतीने क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात तांदूळ जमा केला होता. विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी हा तांदूळ वापरल्याने शासनाकडून मिळालेला तांदूळ शिल्लक राहिल्याचे सांगण्यात येते. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर जरूघाटा येथील नागरिकांनी शाळेत जाऊन विचारणा केली.
या पार्श्वभूमीवर ऑगस्ट महिन्यात दिनकरनगरचा पोषण आहाराचा तांदूळ शाळेत न उतरवता जरूघाटा शाळेत उतरवण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर १३ ऑगस्टला दिनकरनगरचे चार आणि जरूघाटा शाळेचे दोन, असे सहा कन्ट्टे तांदूळ शाळेसमोरच वजन करून व्यापाऱ्याला विकण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
यावेळी दिनकरनगरच्या मुख्याध्यापकांनी चार कट्टे तांदूळ जरूघाटा शाळेत उतरविण्यास सांगितल्याचे व जरूघाटा शाळेतील दोन कट्ट्यांसह एकूण सहा कट्टे तांदूळ व्यापाऱ्याला विकल्याचे कबूल केल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. मंगळवारी जरूघाटा शाळेत दिनकरनगर व जरूघाटा येथील ग्रामस्थांची बैठक झाली. यात दोन्ही मुख्याध्यापकांनी प्रकरणाची कबुली दिल्याचा दावा करण्यात आला.






