‘करेक्ट कार्यक्रम करणाऱ्यांचाच आम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम केला’; जिल्हा बँकेवरील जयंत पाटलांचे वर्चस्व संपुष्टात आणल्याचा पडळकरांचा दावा (File Photo)
जत गटातील मतदारांचे अभिनंदन करताना पडळकर म्हणाले, जत तालुका नवनवीन इतिहास घडवण्यात माहिर आहे. पुढील पिढीचे नेतृत्व करणारे नेते सातत्याने वेगवेगळे नॅरेटिव्ह सेट करत होते. मात्र, जतच्या जनतेने त्यांचे नॅरेटिव्ह मोडून काढले आहे. ‘करेक्ट कार्यक्रम करणाऱ्यांचाच कार्यक्रम झाला आहे. आम्ही त्यांना टप्प्यात आणून कार्यक्रम केला. जतच्या जनतेनेही त्यांचा कार्यक्रम केला,’ अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर हल्ला चढवला.
जिल्हा बँकेवर एकहाती वर्चस्व ठेवण्याचा काही नेत्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. विरोधकांच्या संस्था मोडीत काढून त्या कवडीमोल दराने विकत घेण्याचा उद्योग सुरू असल्याचे सांगत त्यांनी या प्रवृत्तीला आव्हान दिले. ‘जिल्ह्यात मी म्हणेल तेच होईल, अशी मक्तेदारी आता चालू देणार नाही,’ असे स्पष्ट करत जिल्ह्याच्या राजकारणात कोणाचीही एकाधिकारशाही खपवून घेतली जाणार नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.
घोरपडेंना पाडण्यासाठी कटकारस्थाने; पैशांचा वापर झाल्याचा आरोप
आम्ही ताकदीने शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहणार आहोत, असे सांगत पडळकर यांनी कवठेमहांकाळमधील निवडणुकीचाही उल्लेख केला. घोरपडे यांना पराभूत करण्यासाठी अनेक कटकारस्थाने रचण्यात आली. मात्र, ते सर्वांना पुरून उरले आहेत, असे ते म्हणाले. निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशांचा गैरवापर झाला असून, मतदारांना विविध आमिषे दाखवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. ‘आम्ही निवडणुकीच्या मैदानात उशिरा उतरलो असलो, तरी थेट बँकेत पोहोचलो आहोत,’ असे सांगत त्यांनी आपल्या विजयाचे राजकीय महत्त्व अधोरेखित केले.
बँकेच्या सत्तेबाबत वरिष्ठांचा निर्णय मान्य !
जिल्हा बँकेच्या सत्तेत सहभागी होण्याच्या प्रश्नावर पडळकर यांनी सावध भूमिका घेतली. वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल. चांगल्या कामाच्या पाठीशी आम्ही उभे राहू, तर चुकीच्या कामाला विरोध करू, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, बँकेतील नोकरभरतीच्या मुद्द्यावरही त्यांनी आक्रमक भूमिका मांडली. शिपाई भरतीची चौकशी मुख्यमंत्र्यांनी लावली आहे. आता लिपिक पदाच्या परीक्षेतही आम्ही लक्ष घालणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर आता सत्तेची समीकरणे, नोकरभरती आणि बँकेच्या कारभारावरूनही राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.
1. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत गोपीचंद पडळकर कुठून विजयी झाले?
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर जत गटातून विजयी झाले.
2. विजयाबाबत पडळकरांनी काय दावा केला?
आपल्या विजयामुळे जिल्हा बँकेचे संपूर्ण राजकीय गणित बदलले असून, बँकेवरील जयंत पाटलांचे वर्चस्व संपुष्टात आणल्याचा दावा त्यांनी केला.
3. पडळकरांनी विरोधकांवर कोणत्या शब्दांत टीका केली?
‘करेक्ट कार्यक्रम करणाऱ्यांचाच आम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम केला,’ अशा आक्रमक शब्दांत त्यांनी विरोधकांवर टीका केली.






