शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तयारी पूर्ण; लवकरच दिलासा मिळणार...
नांदेड : राज्यातील 14 जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकीदार असून, त्यात विदर्भातील नागपूर, अमरावती, बुलढाणा या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. त्यासाठी ३० जून २०२५ व ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती सहकार विभागाने बँकांकडून मागविली आहे.
१९९० पासूनचे थकबाकीदार आणि वारंवार कर्जमाफीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचीही माहिती आहे. कर्जमाफीच्या अभ्यासासाठी समितीची नेमणूक राज्य सरकारने कर्जमाफीच्या अभ्यासासाठी समिती नेमली असून, या समितीचा अहवाल पुढील दीड महिन्यात शासनाला सादर होणार आहे. सध्या सर्वच शेतकऱ्यांचे कर्जमाफीकडे लक्ष लागले आहे. ज्यांची माहिती शासनाला जाणार नाही, तेथील शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहू शकतात, असेही बोलले जात आहे. दरम्यान, थकबाकीदार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार की काही लाखांची कर्जमाफी मिळणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
हेदेखील वाचा : शेतकरी कर्जमाफीवर कृषिमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा; शेतकऱ्यांना सरसकट लाभ मिळणार, 30 मार्चपूर्वी…
दीर्घकालीन उपाययोजना आणि कर्जमाफीचा निर्णय घेतला जाणार आहे. कर्जमाफीसाठी साधारणतः ४० हजार कोटी रुपये लागणार आहेत. ३० जून २०२५ पर्यंत राज्यातील २४ लाख ७३ हजार ५६६ शेतकऱ्यांकडे ३५ हजार ४७७ कोटींची थकबाकी आहे. २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षांतील नियमित कर्जदार शेतकऱ्यांचीही माहिती सहकार विभागाने मागविली असून, त्यांनाही प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे.
शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा मुद्दा महत्त्वपूर्ण
राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा मुद्दा महत्त्वपूर्ण आहे. या कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे डोळे सरकारच्या घोषणेकडे लागून असतात. यातून शेतकऱ्यांना मोठा दिलासाही मिळतो. त्यातच आता राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ३० जून २०२६ पूर्वी राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा सरसकट लाभ दिला जाईल, अशी घोषणा यापूर्वीच केली होती. त्यानंतर आता ही नवीन माहिती समोर आली आहे.
हेदेखील वाचा : टिपू सुलतान हा पाकिस्तानचा नायक तर क्रिकेटचा सामना कशाला? खासदार संजय राऊतांची मॅचवरुन राजकीय टीका






