सौजन्य - नवराष्ट्र टीम
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, शिव, शाहू, फुले, आंबेडकरांची विचारधारा व काँग्रेस पक्ष या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. राजकीय पक्ष हे विचारधारेवर काम करत असतात आणि काँग्रेस पक्ष ही वैचारिक लढाई निष्ठेने व निकराने लढत आहे. पण आज काही पक्ष हे केवळ सत्ता व सत्तेतून भ्रष्ट मार्गाने पैसा मिळवणे व त्या पैशातून निवडणुका जिंकणे हे काम करत आहेत. पैसा फेक व तमाशा देख हे वगनाट्य जोरात सुरु आहे. काँग्रेसची विचारधारा देशाला तारणारी आहे आणि प्रशांत जगताप यांनी आज काँग्रेसच्या प्रशांत महासागरात प्रवेश केला आहे, त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत आहे.
काँग्रेस पक्षाला विचारांचा वारसा आहे, समता, बंधुता, सामाजिक न्याय या मुल्यांसाठी काँग्रेसचा लढा आहे. तर दुसरीकडे जातीवादी मनुवादी विचाराचा भाजपा पक्ष आहे. भाजपाची भूमिका ही केवळ मूठभर लोकांच्या हाती राजसत्ता व धर्मसत्ता असावी अशी आहे. काही लोकांना काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री, मंत्री आमदार खासदार सर्व पदे दिली पण त्यांची घुसमट होते म्हणून ते काँग्रेस पक्ष सोडून गेले. लोक उगवत्या सुर्याला नमस्कार करतात पण जगताप आणि वैचारिक लढ्यासाठी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले की, प्रशांत जगताप हे राष्ट्रावादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) यांच्या बरोबर काम करत होते. प्रशांत जगताप यांनी जातीयवादी पक्षाबरोबर जाणार नाही ठाम भूमिका घेतली व काँग्रेस पक्षात प्रवेश केला, विचारांशी बांधिलकी अशी असली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर विचारांशी तोडजोड न करणारे ते नेते आहेत. त्यांना अनेकांनी ऑफर दिली, थांबावण्याचा प्रयत्न केला पण प्रशांत जगताप यांनी पुरोगामी शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार सोडला नाही असे नेते असतील तर २०२९ आपले असेल, असा विश्वास वडट्टेवार यांनी व्यक्त केला.
प्रशांत जगताप यावेळी म्हणाले की, काँग्रेस पक्ष १३५ वर्षांचा जुना पक्ष असून, अथांग महासागर आहे. कितीही वादळे आली तरी काँग्रेस पक्ष हिमालयासारखा खंबीरपणे उभा आहे. पुरोगामी विचाराचा मी कार्यकर्ता असून, शिव शाहू फुले आंबेडकर, गांधी व नेहरु विचार पुढे घेऊन जाण्यासाठी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. माझी लढाई जातीवादी व भ्रष्टाचाराविरोधात आहे. आणि आज भाजपाला फक्त काँग्रेस पक्षच टक्कर देऊ शकतो असे जगताप म्हणाले.






