मुंबई : भोंग्याच्या प्रकरणी केलेल्या आंदोलनादरम्यान महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की झाली होती. या प्रकरणी संदीप देशपांडे (Sandeep Deshpande), संतोष धुरी (Santosh Dhuri) यांच्यावर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आता या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. घटनेच्या दिवसापासून दोन्ही नेते पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
मनसेने काही दिवसांपूर्वी मशिदींवरील भोंग्यांविरोधात आंदोलन केलं होतं. कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरु होती. त्यातच 4 मे रोजी राज ठाकरे यांचं निवासस्थान शिवतीर्थाबाहेर संदीप देशपांडे माध्यमांशी बोलत असताना पोलीस तिथे त्यांना ताब्यात घेण्यासाठी आले. आम्ही येतो असं सांगत संधी मिळताच संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी तिथून पळ काढला. पोलीस त्यांच्या मागे धावले. परंतु या सगळ्या झटापटीत संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यामुळे महिला पोलीस जखमी झाल्या होत्या. तेव्हापासूनच मुंबई पोलिसांकडून त्यांची शोधाशोध सुरु आहे. पण बेपत्ता असलेल्या दोन्ही मनसे नेत्यांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली असून त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडणार आहे. दरम्यान, संदीप देशपांडे यांचा ड्रायव्हर 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे.
[read_also content=”ज्ञानवापी मशिद प्रकरणी आज सर्वेक्षणाचा अहवाल न्यायालयात सादर होणार https://www.navarashtra.com/india/the-report-of-the-survey-in-the-gyanvapi-masjid-case-will-be-presented-in-the-court-today-280916.html”]






