मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फोटो- ट्विटर)
सोलापूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची प्रचारसभा
महानगरपालिका जिंकण्यासाठी भाजपचा जोरदार प्रचार
15 तारखेला मतदान अन् 16 ला निकाल जाहीर होणार
Solapur News: राज्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी 15 तारखेला मतदान तर 16 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान राज्यातील महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने जोरदार प्रचार सुरू केल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या प्रचारात सहभागी झाल्याचे दिसून येत आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरमध्ये जाहीर सभा घेतली आणि नागरिकांना संबोधित केले.
सोलापूरमध्ये प्रचारसभेला संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी इथे यायच्या आधी आपले ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांचे दर्शन घेण्यासाठी गेलो होतो. पुढील 5 वर्षे या महानगरपालिकेच्या माध्यमातून सोलापूरकरांची सेवा करण्याचा आशीर्वाद घेऊन आलो आहे. सोलापूरची आणि तेथील जनतेची सेवा आपल्यासाठी ईश्वरसेवाच आहे. दक्षिण भारताचे प्रवेशद्वार म्हणून सोलापूरची ओळख आहे.”
पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “हा सोलापूर जिल्हा डाळिंबाची राजधानी म्हणून ओळखला जातो. सोलापूरची चादर, कडक भाकरी, चटणी अशी ओळख या शहराने मिळवून दिली आहे. आता या शहराला आधुनिक शहर म्हणून ओळख द्यायची आहे. पंतप्रधान मोदी यांनी शहरांचा विकास करायचा हे सांगितले. ”
“आपली शहरे विकासाची केंद्रे झाली पाहिजेत असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. तयासाठी योग्य नियोजन केले पाहिजे. तयासाठी केंद्र सरकारने अनेक योजना सुरू केल्या. त्यासाठी हजारो कोटी रुपये मोदी यांनी दिले. आम्ही सोलापूरमधली विमानसेवा सुरू करून दाखवली, पुढील टप्प्यात आम्ही नाइट लॅंडींगची सोय करणार आहोत. नाशिक सोलापूर अक्कलकोट हा नवीन रस्ता आपण करतोय. हा नवीन रस्ता तुम्हाला नवीन होत असलेल्या वाढवण बंदराला जोडणार आहे.”
“आम्ही केवळ आश्वासने देणारे नाही तर ते पूर्ण करणारे आहोत. विधानसभा निवडणुकीत आपण अभूतपूर्व यश प्राप्त झाले. त्यानंतर विरोधकांनी लाडकी बहीण योजना बंद करतील असे म्हणायला सुरूवात केली. मात्र जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोवर लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. आता आमच्या लाडक्या बहिणींना लखपती दीदी करायचे आहे.”
अजित पवारांनी उपसली ‘तलवार’
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये १५ जानेवारी रोजी महापालिका निवडणुका होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी बुधवारी “अलार्म” मोहिमेची घोषणा केली. पवार म्हणाले की, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पाणीटंचाई, कचऱ्याचे ढीग, वाहतूक कोंडी आणि वाढते प्रदूषण हे प्रशासकीय अपयशाचे भयानक संकेत आहेत. ते म्हणाले की, जनतेने जागे होऊन शहरासाठी अलार्म वाजवण्याची वेळ आली आहे.






