File Photo : LandSlide
पेठ वडगाव : हातकणंगले तालुक्यातील कासारवाडीसह परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. त्यामुळे नाले, ओढ्यांना पूर आला. तसेच शेती पिकांचे, शेतीच्या बांधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या परिसरात काढणीला आलेले सोयाबीन, भुईमूग पीकांमध्ये पाणी साठल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हेदेखील वाचा : अतिवृष्टीमुळे हैराण झालेल्या हिमाचल प्रदेशातील नागरिकांना आता उष्णतेचा बसतोय फटका; शिमल्यात 30 वर्षांचा रेकॉर्ड मोडला
पावसाळ्यातही इतका मोठा पाऊस झाला नाही. पण अवघ्या काही तासात पाणी पाणी झाले. दुपारी तीन वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तासभर ढगफुटीसदृश पाऊस झाला. सुमारे दोन अडीच तास एकसारखा पाऊस या परिसरात कोसळत होता. मुसळधार पावसाने शेतातील उभी पिके भुईसपाट केली. कासारवाडी, अंबपवाडी, मनपाडळे, पाडळी, अंबपसह परिसरात या पावसाचा चांगलाच तडाखा बसला.
शिरोली (पु.) आणि वाठार तर्फ वडगांव महसूल मंडळातील गावामध्ये या पाऊसाचा तडाखा बसल्याने काढणीस आलेले सोयाबीन भुईमुग पिक पाण्यात गेल्याचे दिसून आले. तर पुणे-बंगलुरू राष्ट्रीय महामार्गालगत टोप येथील शेतकरी पंपाजवळ सेवा रस्त्याच्या सुमारे पाच ते सहा फूट भराव वाहून गेल्याने वाहतुकीस धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्यातही इतका मोठा पाऊस झाला नाही. तेवढा पाऊस झाला आहे.
राज्यातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज
राज्यात उघडीप दिलेला पाऊस आता परतीच्या मार्गावर आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यातच मुंबईसह ठाण्याचा पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर कोकणातील रायगड आणि पुण्याला पावसाचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. याशिवाय, हवामान विभागाने नाशिक, नगर, पुणे, पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, सांगली, सोलापूर यांसह इतर काही जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.