बुलढाणा जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात संतप्त शेतकाऱ्याने चक्क भाजपचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार आमदार संजय कुटे यांचं निवासस्थान पेटवून देण्याचा प्रयत्न केलाय. अतिवृष्टीमुळे शेतीच झालेलं नुकसान भरपाई न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्याने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली.
Bhivandi News: भिवंडीतील एका केमिकल गोदामाला आग; २५० कोटींचे नुकसान
संजय कुटे हे 2004 पासून सलग विधानसभेवर निवडून येत असून, भाजपचे विश्वासू नेतृत्व म्हणून ओळखले जातात. हल्ला करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव विषारी मुरुड आहे. हा संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथील रहिवासी आहे. या शेतकऱ्याने हातात पेट्रोलचा कॅन घेऊन संजय कुटे यांच्या घराच्या प्रवेशद्वाराकडे जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तो ओरडत होता की, “माझ्या शेतीचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असून, अद्याप मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे मी आमदारांचा बंगला पेटवतो.” यावेळी आ. कुटे यांच्या स्वीय सहाय्यकाने तत्काळ हस्तक्षेप करून मुरुड याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.
पुढे आलेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर या गावातील शेतकरी विशाल सुधाकर मुरुड यांच्या शेतात 2024 साली अतिवृष्टीमुळे नुकसान झालं होतं. त्यांनी वेळोवेळी संग्रामपूर तहसील कार्यालयात कागदपत्रे ही जमा केली होती. त्यांचं बँक अकाउंट केवायसी ही केलं होतं. मात्र तरीही शेतीचे नुकसान भरपाई रक्कम न मिळाल्याने या संतप्त शेतकऱ्यांने जळगाव जामोदचे भाजपा आ. संजय कुटे यांना आधी समाज माध्यमात त्यांच जळगाव जामोद येथील निवासस्थान “तृप्ती व्हिला” हे जाळून टाकण्याची धमकी दिली होती.
यालाच अनुसरून या शेतकऱ्याने काल रात्री संजय कुटे यांच्या निवासस्थानी जाऊन निवासस्थानात प्रवेश मिळवून संजय कुटे यांचे निवासस्थान जाण्याचा प्रयत्न केला. मात्र समयसुचकता दाखवत संजय कुटे यांच्या स्वीय सहायकाने या शेतकऱ्याला वेळीच पकडल्याने पुढील अनर्थ टळला.या प्रकरणी BNS 333 आणि 351(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जळगाव जामोद पोलीस करत आहेत. राज्यात शेतकऱ्यांची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.या संपूर्ण घटनेनंतर मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नासह लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानाच्या सुरक्षेचा प्रश्नही अधोरेखित झाला आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.