जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर कायम असल्याने अनेक नद्या आणि ओढे दुथडी भरून वाहत आहेत. याचा थेट परिणाम जिल्ह्यातील वाहतुकीवर झाला असून, तब्बल ५६ बंधारे पाण्याखाली गेले असल्याने अनेक ग्रामीण भागांचा संपर्क तुटला आहे.
कोल्हापूर: जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून धरण क्षेत्रात अतिवृष्टी सुरु असल्याने या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. पंचगंगा, दूधगंगा, कुंभी, कासारी, वारणा वेदगंगा, घटप्रभा, भोगावती, ताम्रपर्णी सह जिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
गेल्यावर्षीच्या तुलनेत धरणात अधिकचा साठा असल्याने भविष्यात पडणाऱ्या पावसाचा अंदाज घेता धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. पंचगंगेची पाणीपातळी ३४ फुट ७ इंचांवर गेली आहे. गेल्यावर्षी याच दिवशी राधानगरी धरणात २७ % पाणी साठा होता तर आज राधानगरी धरण ६५ % पाणी साठा आहे.राजारामसह ५६ बंधारे पाण्याखाली असून वाहतूक विस्कळीत झाली आहे.कोल्हापूरची तहान भागवणारा कळंबा तलाव देखील सांडव्यावरून आज ओव्हर फ्लो झाला आहे.
सततच्या पावसाने संपूर्ण शहराला अक्षरशः तळ्याचे स्वरूप आले असून, अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहे. याचा सर्वाधिक फटका व्यापारी वर्गाला बसला असून, शहरातील प्रसिद्ध महाद्वार रोडसह अनेक भागांतील दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. सकाळपासूनच कोल्हापुरात ढगाळ वातावरण होते, पावसाने नागरिकांची अक्षरशः दैना उडवली. शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. धरणक्षेत्रात जोरदार पाऊस असल्याने पाटबंधारे विभागाने राधानगरी धरणातून विसर्ग वाढवला आहे. सध्या प्रति सेंकद २५०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने ‘भोगावती’, ‘पंचगंगा’ काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.
गेल्या २४ तासांत शाहूवाडी, गगनबावडा, गडहिंग्लज, आजरा, कागल, भुदरगड तालुक्यांत जोरदार पाऊस कोसळला आहे. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू असल्याने राधानगरी, दूधगंगा, कासारी, घटप्रभा, तुळशी धरणातून विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे ‘भोगावती’ व पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ होत आहे. सद्या जिल्ह्यात ५६ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
संततधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून, नदी आता इशारा पातळीच्या दिशेने वाटचाल करत आहे. आज सकाळी नोंदवलेल्या आकडेवारीनुसार, पंचगंगेची पाणी पातळी ३४.७ फुटांवर पोहोचली आहे, ज्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर कायम असल्याने अनेक नद्या आणि ओढे दुथडी भरून वाहत आहेत. याचा थेट परिणाम जिल्ह्यातील वाहतुकीवर झाला असून, तब्बल ५६ बंधारे पाण्याखाली गेले असल्याने अनेक ग्रामीण भागांचा संपर्क तुटला असून, नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फूट आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास लवकरच नदी इशारा पातळी गाठेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून, नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. संभाव्य पूरस्थितीचा धोका लक्षात घेता आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. शंभरावर गावांचा थेट संपर्क तुटला आहे. पूर नियंत्रण कक्षाने पुढील यादी जाहिर केली असून, विविध नद्यांवरील बंधाऱ्यांची माहिती देण्यात आली आहे.
Web Title: Heavy rains in kolhapur cut off connectivity to 100 villages panchganga river high level alert