तासिका प्राध्यापक अद्यापही पगारच्या प्रतिक्षेत; मानधनाअभावी जगावे लागतंय वेठबिगारांचे जीणे (File Photo : Nagpur University)
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील तासिका प्राध्यापकांना अध्यापन मान्यता न देण्यात आली नाही. परिणामी, गेल्या तीन महिन्यांपासून तासिका प्राध्यापकांना वेठबिगारांचे जीणे जगावे लागत आहे, असा आरोप महाराष्ट्र अंशकालीन प्राध्यापक संघटना व प्राध्यापक पदभरती महासंघाकडून करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागाने तासिका प्राध्यापकांना दरमहा मानधन अदा करण्याचा निर्णय 14 नोव्हेंबर 2018 रोजी निर्गमित केला. गेल्या सात वर्षात या शासननिर्णयाची महाविद्यालये, विद्यापीठे आणी सहसंचालक कार्यालयाने अद्यापपर्यंत अंमलबजावणी केलेली नाही. 17 ऑक्टोबर 2022 रोजी शासन निर्णयातून तासिका प्राध्यापकांच्या संघटनेला नेमणुकीचा व वेतनापर्यंतच्या प्रवासाचा संपूर्ण टप्पा 9 शिफारशी देऊन पूर्ण केला.
हेदेखील वाचा : Skill Development : कौशल्य विभागाच्या संस्थांमध्ये केवळ स्वदेशी कन्सलटंसी कंपन्यांनाच प्राधान्य, मंगलप्रभात लोढा यांचा निर्णय
दरम्यान, महाविद्यालयाचा कार्यभार तपासणी 15 फेब्रुवारी, नाहरकत प्रमाणपत्र मागणी 1 मार्च, नाहरकत प्रमाणपत्र निर्गमित १५ मार्च, महाविद्यालयांची जाहिरात १ एप्रिल, अर्ज तपासणी, मुलाखत, उमेदवार निवड १५ एप्रिल, नेमणूक आदेश निर्गमित ३० एप्रिल, विद्यापीठ मान्यता ३१ मे, तासिका प्राध्यापकांची सेवा सुरू शैक्षणिक वर्षारंभ १५ जून असे ठरविण्यात आले. मात्र, उच्च शिक्षण विभागाच्या शासननिर्णयाला तासिका प्राध्यापकाच्या वेतनासंदर्भात या सर्व कार्यक्रमालाच हरताळ फासलेला आहे.
महासंघाचा सरकार दरबारी लढा
सणासुदीच्या दिवसात घरात कमवत्या माणसाकडेच पैसा नसेल तर त्याच्या जगण्याचा काय उद्देश राहणार. आतापर्यंत अशाच आर्थिक अडचणीला कंटाळून राज्यातील १५ तासिका प्राध्यापकांनी आत्महत्या केल्या. यासंदर्भात महासंघाने अनेक निवेदने सरकार दरबारी दिलेली आहे. दरवर्षीच्या नियुक्ती संदर्भात केलेल्या तरतूदीची वेळेवर अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे सरसकट शासनाने ८० हजार रूपये महिना वेतन व ११ महिन्यांची नियुक्ती देऊन ‘समान काम समान वेतन’ या मागणीला न्याय देऊन तासिका प्राध्यापकांना या शैक्षणिक वेठबिगारीतून बाहेर काढावे, अशी मागणी केली जात आहे.