डिजीटल अरेस्टच्या नावावर २ कोटींचा गंडा (फोटो - सोशल मीडिया)
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यांसारख्या घटना घडत आहेत. फसवणुकीच्या घटनाही लक्षणीय आहेत. असे असताना आता जनजागृती आणि वारंवार सतर्क केल्यानंतरही लोक सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकत आहेत. शहरात अशाप्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाली.
आता सायबर गुन्हेगारांनी एका सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्यासह दोघांना जवळपास 2 कोटी रुपयांचा चुना लावल्याचे उघडकीस आले. पीडित 62 वर्षीय सेवानिवृत्त बँक अधिकारी प्रतापनगर ठाण्यांतर्गत राहतात. 6 नोव्हेंबरला विनिता शर्मा आणि प्रेमकुमार गौतम नावाच्या दोन गुन्हेगारांनी त्यांना दोनदा व्हॉट्सअॅप कॉल केले. दहशतवादी विरोधी पथकाचा (एटीएस) अधिकारी असल्याचे सांगून पीडिताचे नाव मनी लाँड्रिंग प्रकरणात आले असून, त्यांना अटक करण्याची धमकी दिली. घाबरलेल्या पीडिताने अटक न करण्याची विनंती केली.
दरम्यान, आरोपींनी एक कोटीची मागणी करून त्यांना डिजिटल अरेस्ट केले. तेव्हा पीडित व्यक्तीने त्यांच्याजवळ इतके पैसे नसल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपींनी नवा बहाणा करत पैसे लुबाडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपींनी सांगितलेल्या बँक खात्यांमध्ये वेळोवेळी एकूण ५५.२० लाख रुपये जमा केले. आरोपींनी पुन्हा त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. यामध्ये पीडित व्यक्तीने जेव्हा नातेवाईकाकडे उसणे पैसे मागितले, तेव्हा चौकशीत प्रकरण बाहेर आले.
सायबर गुन्हेगारांनी 1.50 कोटी उकळले
दुसरी घटना, सीताबर्डी ठाण्यांतर्गत घडली. ७० वर्षीय शेतकऱ्याची झारखंडमध्ये शेतजमीन आणि नागपुरात फ्लॅट आहे. गेल्या २७ ऑक्टोबरला ते झारखंडमध्ये होते. एका व्यक्तीने एटीएस अधिकारी असल्याची बतावणी करून त्यांना व्हॉट्सअॅप कॉल केला. त्यांचे नाव मनी लॉन्ड्रींग आणि अमली पदार्थाच्या तस्करीत आल्याची थाप मारून अटक करण्याची धमकी देत त्याने त्यांना डिजिटल हाऊस अरेस्ट केले. गुन्हेगाराने वेळोवेळी त्यांच्याकडून १ कोटी ५० लाख रुपये वसूल केले.
हेदेखील वाचा : NPCI ने जारी केला अलर्ट, ‘Digital Arrest’ स्कॅमपासून सावध राहा! या कॉल्सना उत्तर दिल्यास होईल मोठं नुकसान
डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ
देशभरात डिजीटल अरेस्टच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. याच सर्व घटना लक्षात घेऊन आता नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने एक अलर्ट जारी केला आहे. NPCI ने लोकांना विनंती केली आहे की, अनोळखी नंबरवरून आलेले कॉल्स उचलणं टाळा. अनोळखी नंबरवरून येणारे कॉल्स आणि व्हॉट्सअॅप मेसेजवर विश्वास ठेऊ नका. कारण हे असे कॉल्स आणि मेसेज लोकांची फसवणूक करण्यासाठी वापरली जाणारी नवीन पद्धत आहे.






