देशभरात सगळीकडे रमजान ईदचा उत्साह आहे. रमजान ईद अवघ्या काही दिवसांवर आली आहे.या ईदनिमित्त सर्व बाजारपेठा सजल्या आहेत. सगळीकडे बाजारामध्ये ग्राहकांची दूध, फळे इतर साहित्य घेण्यासाठी मोठी गर्दी रंगली आहे. फाळके रोडवर सामान खरेदीसाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे. मात्र यंदाच्या वर्षी बाजारात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुस्लिम बांधवांकडून रमजान ईदच्या खरेदीसाठी व्यापाऱ्यांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. लहानमुलांपासून ते मोठ्यापर्यंत सगळेच ईदच्या खरेदीसाठी बाजरात जात आहेत.
दिवसभर मोठ्या प्रमाणात ऊन जाणवत असल्याने खरेदीसाठी नागरिक संध्याकाळी मोठी गर्दी करत आहेत. कपडे, पादत्राणे, इस्लामी टोपी खरेदी करण्यावर नागरिकांचा मोठा कल आहे. संध्याकाळी इफ्तारनंतर मेनरोड, शालिमार, भद्रकाली या दूध बाजारांमध्ये नागरिकांची गर्दी होताना दिसत आहे. तसेच संध्याकाळच्या वेळी कपडे खरेदीसाठी मुस्लिम बांधवांची गर्दी आहे. रमजान ईदला अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असताना बाजारात मोठी गर्दी आहे. बाजारामध्ये सगळ्यात जास्त कपड्यांची खरेदी केली जात आहे.
दूध बाजार चौक ते फाळके रोड या भागात दरवर्षी फक्त इफ्तार बाजार भरतो. पहिला इफ्तार झाल्यानंतर बाकीचे बाजार भरतात. या बाजारामध्ये कपडे, पादत्राणे, महिलांचे आभूषण, अत्तर, भेटवस्तू, खाद्यपदार्थ, सजावटीचे साहित्य, मेहंदी, मेहंदीचे कोण यांच्यासह ईदला लागणारे सगळे साहित्य मिळते. तसेच या प्रत्येक वस्तू योग्य दरामध्ये मिळतात. एकाच ठिकाणी सर्व वस्तू मिळत असल्याने नागरिकांची गर्दी यंदा या बाजारात झाली आहे. तसेच नागरिकांची पायपीट देखील कमी झाली आहे.
सध्याचं युग हे ऑनलाईन युग आहे. ऑनलाईन पद्धतीने खरेदी केल्यानंतर सर्व वस्तू घरपोच मिळतात. त्यामुळे बहुतांश नागरिक ऑनलाईन खरेदीला प्राधान्य देतात. मात्र या ऑनलाईन खरेदीचा फारसा फटका बाजारातील व्यापाऱ्यांना बसलेला नाही. दूध बाजार ते फाळके रोड बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी झाली आहे. तर मुंबईतील मोहम्मद अली रोड बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी असल्याचे चित्र आहे.