फोटो - सोशल मीडिया
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यात नागपूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत हा काँग्रेस पक्ष झाला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा प्रवेश झाल्याने आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Elections 2024: भाजपच्या ‘चाणक्यां’नी विधानसभेसाठी पदाधिकाऱ्यांना दिला ‘हा’ गेम प्लॅन; ‘मविआ’चे टेन्शन वाढले
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जवळपास सर्वच पक्षांनी तयारी केली आहे. या निवडणुकीची घोषणा अद्याप झालेली नाही. तरीही जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. अनेक नेतेमंडळींचा पक्षप्रवेश होताना दिसत आहे. असे असताना राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले. काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार राज्यात येईल, असा विश्वास महाविकास आघाडीकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळेच राज्यभरात विविध पक्षाचे कार्यकर्ते काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) चे महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेलच्या सरचिटणीस कल्पना मानकर, धनराज फुसे, राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष अरविंद ढंगरे यांच्या नेतृत्वात राजकुमार जी. वानखेडे, योगेश धनराज फुसे, राजेश कुहीकर, राधेश्याम म्हात्रे, ज्योती सोमकुंवर, संदीप वानखेडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे.
महाराष्ट्रात केवळ काँग्रेसच्या नेतृत्वातच प्रगतीशील सरकार
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले. महाराष्ट्रात केवळ काँग्रेसच्या नेतृत्वातच प्रगतीशील, स्थिर व मजबूत सरकार मिळू शकते. राहुल गांधी यांचे देशाच्या विकासचे व्हीजनच देश एकसंध ठेवत देशाला खऱ्या अर्थाने जागतिक महासत्ता बनवू शकते, असे मनोगत प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. या प्रवेशामुळे नागपूर महानगरात काँग्रेस पक्ष संघटना अधिक मजबूत झाली आहे.
हेदेखील वाचा : दिल्लीच्या कामगारांकडे दिवाळीआधीच आली लक्ष्मी; नवनियुक्त CM आतिशी यांचा महत्त्वपूर्ण निर्णय