Photo Credit- Social Media आतिशी मार्लेंनांच्या विरोधात काँग्रेसच्या या नेत्या निवडणुकीच्या रिंगणात
नवी दिल्ली : दिल्लीच्या राजकारणाची चर्चा सध्या देशभर रंगली आहे. आपच्या नेत्या आतिशी मार्लेना यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली आहे. नवनियुक्त आतिशी मार्लेना यांनी आपल्या निर्णयाने वेगळी छाप पाडण्यास सुरुवात केली आहे. आतिशी मार्लेना यांच्या नेतृत्वातील दिल्लीच्या आप सरकारने कामगारांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णायामुळे कामगारांच्या वेतनामध्ये बदल होणार असून त्यामुळे कामगार वर्गांमध्ये एकच आनंदोत्सव होत आहे. अतिशींच्या या निर्णयामुळे कामगारांकडे एक महिना आधीच दिवाळी आली आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांनी बुधवारी काही शासन निर्णय जाहीर केले आहे. यामध्ये त्यांनी कामगारांसाठी नवीन किमान वेतन दर जाहीर केले. यामध्ये अकुशल कामगारांसाठी 18,066 रुपये, अर्ध-कुशल कामगारांसाठी 19,929 रुपये आणि असंघटित क्षेत्रातील कुशल कामगारांसाठी 21,917 रुपये निर्धारित केले. मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर आतिशी मार्लेना यांनी कामगारांच्या वेतनासंदर्भात हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णायाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत ही माहिती दिली आहे. त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा भार स्वीकारल्यानंतर ही पहिलीच पत्रकार परिषद असून या दिल्लीतील मजुरांसाठी किमान वेतनाच्या निर्णयाचे श्रेय आपचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिले आहे.
AAP सरकार का ऐतिहासिक फैसला: दिल्ली में न्यूनतम मज़दूरी में वृद्धि‼️
अब न्यूनतम मज़दूरी इस प्रकार होगी👇
🔹अकुशल श्रमिक – ₹18,066
🔹अर्धकुशल श्रमिक – ₹19,929
🔹कुशल श्रमिक – ₹21,917AAP सरकार का भारत निर्माताओं के जीवन को बेहतर बनाने की दिशा में क्रांतिकारी क़दम 🔥 pic.twitter.com/27NBfWFKEK
— AAP (@AamAadmiParty) September 25, 2024
मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांनी पत्रकार परिषदेमध्ये भाजपवर निशाणा साधला. भाजप पक्ष हा कामगारांच्या प्रगतीच्या विरोधात असल्याचे म्हणत त्यांनी हल्लाबोल केला. याबाबत बोलता मुख्यमंत्री आतिशी मार्लेना म्हणाल्या की, “आपल्या देशातील इतर राज्यापेक्षा जास्त किमान वेतन देण्यामध्ये अरविंद केजरीवाल यांचे सरकार सर्वांत पुढे आहे. गरीब लोकांचे शोषण रोखण्यासाठी दिल्ली सरकारने किमान वेतन ऐतिहासिक पातळीवर वाढवले आहे. भाजपने नेहमीच गरीब विरोधी काम केले आहे आणि हे आपण दोन प्रकारे पाहू शकतो,” अशी टीका आतिशी मार्लेना यांनी केली.
भाजपशासित राज्यात दिल्लीच्या या नवीन कामगारांच्या किमान वेतनाच्या अर्धे वेतन दिले जात असल्याचा आरोप आतिशी मार्लेना यांनी केला आहे. त्यांनी कामगारांना उद्देशून सांगितले की, “मोफत वीज, पाणी आणि चांगले शिक्षण याशिवाय दिल्लीच्या आम आदमी पक्षाने ऐतिहासिक निर्णय घेऊन दिल्लीतील कामगारांचे किमान वेतन देशात सर्वाधिक केले आहे. येत्या चार महिन्यांत तुम्हाला सन्माननीय जीवन मिळावे यासाठी प्रयत्न केले जातील.” पुढे आतिशी मार्लेना यांनी भाजपवर टीकास्त्र डागले. त्या म्हणाल्या की, “अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने 2016 साली किमान वेतन वाढवण्याबाबत पहिल्यांदाच चर्चा केली, तेव्हा भाजपने आपल्या लेफ्टनंट गव्हर्नरच्या माध्यमातून आम्हाला रोखले. भाजप हे गरिबांच्या विरोधात, कामगारांच्या विरोधात आणि शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. भाजपने शेतकऱ्यांसाठी तीन काळे कायदे तयार केले. सिंधू सीमेवर शेतकरी बसले तेव्हा त्यांना देशद्रोही आणि खलिस्तानी म्हटले गेले. पण याने पंतप्रधान मोदी किंवा भाजप यांच्यावर काहीही परिणाम होणार नाही,” असा घणाघात दिल्लीच्या नवीन पदभार स्वीकारलेल्या अतिशी मार्लेना यांनी भाजपवर केला आहे.